भोंगा वाजला पाहिजे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंगा वाजला पाहिजे...
आलिशान कारला नाही बैलगाडीच्या थाटाची अन लगबगीची सर

भोंगा वाजला पाहिजे...

sakal_logo
By

शाहू मिलचा भोंगा वाजलाच पाहिजे
शरद पवार; राज्यात तापलेल्या भोंग्यावरून राजकारण करणाऱ्यांना चपराक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : राज्यभरात भोंग्यावरून वातावरण तापले असताना छत्रपती शाहू मिलचा भोंगा वाजला पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भोंग्यावरून राजकारण करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली. श्री. पवार यांच्या या सूचनेवर छत्रपती शाहू मिलच्या हॉलमध्ये हास्यकल्लोळ उडाला. शाहू मिलच्या भोंग्यावरून श्री. पवार यांनी शाहू महाराजांचे विचारच राज्याला आणि देशाला पुढे नेऊ शकतात असाच अप्रत्यक्ष संदेश दिला.
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त शाहू मिलमध्ये आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत मिलच्या हॉलमध्ये आले. तेथे त्यांना मिलमध्ये साकारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजित शाहू स्मारकाची चित्रफित दाखविली. त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मिलच्या ७० एकर परिसरात स्मारकाचा आराखडा कसा असेल हे श्री. पवार यांना सांगण्यास सुरुवात केली.
ही माहिती ऐकत असताना श्री. पवार यांनी अचानक सरनोबत यांना मिलचा भोंगा वाजणार का, असा प्रश्‍न केला. तो न कळाल्याने सरनोबत त्यांच्या जवळ गेले. प्रश्‍न ऐकल्यानंतर सरनोबत यांनी भोंगा वाजणार असल्याचे सांगितले. त्यावर पवार यांनी भोंगा वाजला पाहिजे, असे म्हणताच उपस्थितांत हास्यकल्लोळ उडाला.
आमदार अरुण लाड, आमदार प्रा. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

शहरवासीयांचा गजर
राज्यभरात भोंग्यावरून वातावरण तापले आहे. मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एकेकाळी कोल्हापूरवासीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या किंबहुना कोल्हापूरकरांची दिवसाची सुरुवात ज्या भोंग्यामुळे व्हायची तो भोंगा चालू झाला पाहिजे, अशी सूचना करून भोंग्याला विरोध करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली.