
भारनियमन
जिल्ह्यावर भारनियमनाचे संकट
विजेची तूट झाल्यास शहरात दोन, तर ग्रामीणमध्ये चार तास शक्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : विजेची तूट निर्माण झाल्यास महावितरणतर्फे शहरात किमान दीड ते दोन तास भारनियमन केले जाणार आहे. चंदगड, शाहूवाडी, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यातील काही गावांत किमान चार ते पाच तास भारनियमन केले जाईल. उन्हाचा तडाखा व कोरोनानंतरचे पूर्ववत झालेले जनजीवन यामुळे देशभरात विजेची मागणी वाढली आहे. कोळसाटंचाई, नैसर्गिक वायूचा अपुरा पुरवठा व इतर कारणांमुळे मागणीनुसार वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे भारनियमनाला सामोरे जाणे अपरिहार्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात असली तरी जिल्ह्यातील ग्राहकांना भारनियमनाची चिंता आहे.
गत वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेची मागणी तब्बल ३५०० ते ४००० मेगावॉटने वाढली आहे. सद्यस्थितीत महावितरणच्या मागणीने २५ हजार १४४ मेगावॉट असा उच्चांक गाठला आहे. विजेच्या अभूतपूर्व मागणीमुळे खरेदीदेखील वाढविण्यात आली आहे. महावितरणकडून प्रामुख्याने कोळशावर आधारित विविध वीजनिर्मिती कंपन्यांसोबत एकूण २१०५७ मेगावॉट क्षमतेचे वीज खरेदी करार करण्यात आलेले असून, कोळशाची टंचाई व अन्य कारणांमुळे १६४८७ मेगावॉट (७८ टक्के) इतकीच वीज उपलब्ध होत आहे.
या स्थितीत महावितरणच्या मुख्य कार्यालयाला भारनियमनाचे नियोजित वेळापत्रक मिळाले आहे; मात्र त्यानुसार भारनियमन केले जाणार नाही, असे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. विजेची तूट लक्षात घेऊन तसा निर्णय भारनियमनाचा निर्णय घेतला जाणार आहे. कोल्हापूर शहरात ३३० फिडर असून, त्यांचे वितरण व वाणिज्य खाणीनुसार गट केले आहेत.
येथे होणार भारनियमन
चंदगड तालुक्यातील हेरे, वैजनाथ, तुडिये हजगोळी, शाहूवाडीतील मलकापूर, आंबा, आमेनी, सरुड, बांबवडे, भेडसगाव, चांदवट, थावडे, वारुळ, गडहिंग्लजमधील नेसरी, नांगनूर, शिरोळमधील कुटवाडा, गगनबावड्यातील कटाळीसह शहरातील कदमवाडी, शिये, वळीवडे येथे जास्तीत जास्त चार ते पाच तास भारनियमन केले जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..