
सत्तेचाळीस वर्षांनी मिळाला जुन्या स्मृतींना उजाळा
सत्तेचाळीस वर्षांनी मिळाला जुन्या स्मृतींना उजाळा
नूतन विद्या मंदिरातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे, ता. २४ : ‘तुझे काय चाललंय... कशी आहेस... सुना- नातवंडे काय करतात... किती वर्षांनी भेटतो... ओळखलस का... तू आहे तसाच आहे... तु कुठे असतोस... आपले काळोखे गुरुजी पाहिले का... आपली शाळा खूप मोठी झाली... यांसारख्या अनेक प्रश्नांच्या सरबत्तीने बालवयातील आठवणी ताज्या झाल्या. निमित्त होते येथील १९७४-७५ च्या दहावीच्या बॅचच्या नूतन विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे!
सत्तेचाळीस वर्षानंतर येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन विद्या मंदिरातील गुरुजन आणि विद्यार्थ्यांची भेट झाली. या भेटीत विचारपूस, खुशाली, सोबत सुख दु:खाच्या गुजगोष्टी झाल्या. मिष्टान्न जेवणाचा आनंद घेऊन पाणावल्या डोळ्यांनी निरोप घेत सर्वानी परतीचा निरोप घेतला.
वयाची साठ वर्षे ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात करिअर करून यश मिळवले. या सर्व सवंगडयांचा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना तर उजाळा दिलाच, शिवाय सद्यपरिस्थितीवर या मित्रांनी दिलखुलास गप्पा मारल्या. वर्गाच्या चार भिंतीत बसून गप्पा मारलेल्या मित्रांनी आजचा दिवस पुन्हा बालपणासारखा जगून नवी उमेद घेतली.
निवृत्त शिक्षक गणपतराव काळोखे, प्रभाकर आपटे, दिलीप जोशी, विनया गोखले, रंजना वाडेकर, माणिक दिक्षित, वसंत भेगडे, प्रभाकर वाकचौरे, शाळा समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.
गणपतराव काळोखे म्हणाले, ‘‘आपल्या शाळेची ओढ आणि आस्था उतारवयात असणे गैर नाही. वयाची साठ वर्षे ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी आजही भावनिक नाते जपले, याचा आनंद आहे.’’
माजी विद्यार्थी बबन भेगडे म्हणाले, ‘‘वक्तशीरपणा, शिस्त, व्यायाम, शुद्धलेखन असे अनेक धडे गुरुजींनी दिले. त्याचा आज दैनंदिन जीवनात मोठा उपयोग होत आहे.’’
अविनाश बवरे यांनी प्रास्ताविक केले.
------------------------------
तळेगाव दाभाड ः नूतन विद्या मंदिरात झालेल्या स्नेहमेळाव्यात एकत्रित आलेले गुरू शिष्य.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..