
गुन्हे वृत्त
जुन्या भांडणातून दोघांना
चिंचवडमध्ये बेदम मारहाण
पिंपरी, ता. १ : जुन्या भांडणातून दोघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथे घडला. या प्रकरणी सुमीत कमलाकर दाभाडे (ता. फुलेनगर, चिंचवड ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण ससाणे (दत्तनगर, चिंचवड ), आयुष मोरे (फुलेनगर, चिंचवड ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र महावीर चौकाजवळील एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे आरोपी आले. ससाणे यांच्याकडे कोयता होता. जुन्या भांडणाच्या वादातून ''मला खुन्नस का देतोस'' असे आरोपी ससाणे हा फिर्यादीला म्हणाला. त्याने फिर्यादीवर कोयता उगारला असता त्यांचा मित्र अमित मध्ये आल्याने कोयता त्यांच्या डोक्यात लागला. तर आरोपी आयुष याने सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मोशीत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे घडली. चंद्रकांत पांडुरंग काळे (वय ४४) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद तुकाराम काळे यांनी फिर्याद दिली आहे. काळे हे सोमवारी (ता. ३१) दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून मोशीकडून चाकणच्या दिशेने जात होते. मोशी टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने ते गंभीर झाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दिघीतून ऐंशी हजारांचा ऐवज लंपास
घरात शिरलेल्या चोरट्याने ऐंशी हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना दिघी येथे घडली. या प्रकरणी रेश्मा अलीमुद्दीन कुरेशी (रा. आनंद हाईट्स, कॉलनी क्रमांक दोन, विजयनगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या बाहेरगावी गेल्या असता. त्यांच्या घरात नातेवाईक राहण्यास होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाटातून ऐंशी हजारांची सोनसाखळी लंपास केली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिंपळे निलखला दाम्पत्याला बेदम मारहाण
मुलीला घरासमोर खेळायचे नाही, असे म्हटल्याने तिघांनी मिळून दाम्पत्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडला. या प्रकरणी स्वाती नरसिंग गायकवाड (रा. वाकवस्ती, पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयश्री दिनेश मोरे, दिनेश कांतिलाल मोरे, राम कांतिलाल मोरे (सर्व रा. वाकवस्ती, पिंपळे निलख) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे सोमवारी (ता. ३१) सकाळी नऊच्या सुमारास घरी असताना आरोपी घरी आले. ''तुम्ही लोक माझ्या मुलीला घरासमोर खेळायचे नाही'' असे बोलले या कारणावरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच राम मोरे याने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारल्याने त्या जखमी झाल्या. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
भोसरीत एकावर वार
शिवीगाळ कशाला करतो, असे म्हटल्याचा राग आल्याने एकावर वार करण्यात आले. हा प्रकार भोसरी येथे घडला. या प्रकरणी प्रकाश भिकू गायकवाड (रा. बालाजीनगर, एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश जावळे (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. ३१) दुपारी दोनच्या सुमारास बालाजीनगर येथे आरोपी महेश जावळे व त्याचा मित्र यांच्यात मस्करीत शिवीगाळ सुरु होती. त्यावेळी शिवीगाळ कशाला करतो, असे फिर्यादी त्यांना म्हणाले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच धारदार हत्याराने वार केला. तसेच त्यांना चावा घेतला. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पहिल्या लग्नाबाबत न सांगता केले दुसरे लग्न
पहिल्या लग्नाबाबत न सांगता महिलेशी दुसरे लग्न केले. तसेच महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक सबंध ठेवले. हा प्रकार चिखली येथे घडला. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश दिनकर इंदलकर (वय ४१, रा. श्रीराम लोटस सोसायटी, वडगाव शिंदे रोड, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला वेळोवेळी खोटे आश्वासन देत विश्वास संपादन केला. माझे लग्न झाले नाही, असे खोटे सांगितले. त्यानंतर फिर्यादीशी मंदिरात लग्न करतेवेळी त्याच्या पहिल्या लग्नाबाबत सांगितले. दरम्यान, फिर्यादीशी लग्न झाल्यावर फिर्यादी व पहिल्या पत्नीचा देखील सांभाळ करतो, असे खोटे आश्वासन देत फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीच्या संमतीशिवाय शारीरिक सबंध ठेवले. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..