
मतदार यादीतून वगळलेल्या नावांसमोर मारणार डिलीट शिक्का
पिंपरी - राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) प्रभाग रचनेनुसार (Ward Structure) विधानसभेच्या प्रभागनिहाय ४६ मतदार याद्या (Voter List) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने पाच जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या मतदारसंघांची मूळ मतदारयादी व पुरवणी यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून पालिका मागवून घेणार आहे. त्या याद्यातून प्रभागनिहाय विभाजन केले जाणार आहे. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदाराच्या नावांसमोर डिलीटचा शिक्का (Delete Stamp) मारला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून मूळ व पुरवणी मतदार यादी घेऊन त्यातून प्रभागनिहाय मतदार यादी तयार केला जाईल. त्यासाठी अधिकारी कर्मचारी नियुक्तीचे काम सुरू आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा: पिंपरी-चिंचवड महापालिकेत माझ्यामुळेच सत्ता आली होती - एकनाथ खडसे
सहकार आयुक्तांची नियुक्ती
महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकती, सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती, सूचना नोंदविण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी दिला आहे. या हरकतींवर २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी यांच्यासमक्ष सुनावणी घ्यायची आहे. दोन मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..