असंख्य नागरिकांनी घेतले बजाज यांचे अंत्यदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असंख्य नागरिकांनी घेतले बजाज यांचे अंत्यदर्शन
असंख्य नागरिकांनी घेतले बजाज यांचे अंत्यदर्शन

असंख्य नागरिकांनी घेतले बजाज यांचे अंत्यदर्शन

sakal_logo
By

साश्रू नयनांनी राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीच्या आवारात लोटला जनसमुदाय; सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी, ता. १३ ः ज्येष्ठ उद्योगपती, बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे शहरातील सामान्य व्यक्ती, कामगारांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आणि पुणे, मुंबईतील उद्योजकांनी रविवारी (ता. १३) अंत्यदर्शन घेतले. फुलांनी सजवलेली सेज, मनःशांती देणारे संगीत, इस्कॉनच्या साधकांनी सादर केलेली भजने आणि पोलिसांनी दिलेली शासकीय मानवंदना अशा वातावरणाने आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीचा परिसर हेलावून गेला होता.
पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बजाज यांचे शनिवारी (ता. १२) निधन झाले. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी कंपनीच्या आवारातील निवासस्थानी रविवारी सकाळी ठेवले होते. या ठिकाणी ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योजक बाबा कल्याणी, खासदार श्रीनिवास पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख सचिन अहीर, खासदार श्रीरंग बारणे यांनी अंत्यदर्शन घेतले. सकाळी साडेअकरा वाजता कंपनीच्या आवारातील क्रिकेट मैदानाजवळील सांस्कृतिक केंद्रात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, उद्योजिका लीला पूनावाला, बचपन बचाओ आंदोलनाचे कैलाश सत्यार्थी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, महापालिका पक्षनेते नामदेव ढाके, आमदार अण्णा बनसोडे, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, तहसीलदार गीता गायकवाड यांच्यासह सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, उद्योग आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर व कामगारांनी अंत्यदर्शन घेतले. बजाज परिवारातील मधूर बजाज, शिशिर बजाज, शेखर बजाज, नीरज बजाज, सुमन जैन, राजीव बजाज, संजीव बजाज, सुनयना केजरीवाल आदींचे सांत्वन केले.

पोलिसांकडून मानवंदना
उद्योगपती राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वज होता. पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. दुपारी चारच्या सुमारास बजाज यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीकडे नेण्यात आले. त्यावेळी अनेक कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत अंत्ययात्रेत चालत गेले. पार्थिवाचे दर्शन घेताना अनेक कामगारांना अश्रू अनावर झाले होते.

कोट
स्पष्टवक्तेपणा असा राहुल बजाज यांचा स्वभाव होता. मोठ्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. ते एक व्यक्ती नव्हे तर संस्था होती. त्यांची व माझी पहिली भेट १९९१ मध्ये झाली, तेव्हापासून त्यांचे कार्य पाहतो आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोठे आहे. जमनालाल बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा सुरू आहे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्रज्ञ

---
औद्योगीकरणामुळे निर्माण झालेल्या सुखसोयींचा फायदा सर्वांना व्हावा, गरीब मध्यमवर्गीयांनाही त्याचा लाभ मिळावा, यासाठी राहुल बजाज यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांची वाहने ‘हमारा बजाज’ म्हणून घराघरांत पोहोचली. सरकार कोणतेही असो, न पटलेल्या निर्णयाबाबत त्यांचे सडेतोड उत्तर असायचे.
- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
---

राहुल बजाज हे कंपनीच्या आवारात राहणारे एकमेव उद्योजक होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची विशेषतः पिंपरी-चिंचवडची मोठी हानी झाली आहे. कामगारांबाबत त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या जाण्याने कामगार वर्ग देखील हळहळ व्यक्त करीत आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ
---

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top