
आंतरजातीय विवाह सुखी संसार
आंतरधर्मीय विवाहातील जोडप्यांचे जुळले सुखी संसाराचे बंध
‘प्रेमाचा’ दिवस; २५ ते ३० वर्षांच्या खडतर प्रवासानंतरही प्रेमाच्या भिंती कायम
पिंपरी, ता. १३ : आजही पुढारलेल्या शहरात आंतरधर्मीय व जातीय विवाहाला नाकं मुरडली जातात. शिक्षण व संस्कार किंवा कुटुंबांची पार्श्वभूमी याला महत्त्व नसून जातीची लेबल चिकटवली जातात. मात्र, आजही पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात अनेकांनी ३० ते ३५ वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह करूनही आयुष्यात आलेल्या खडतर परिस्थितीवर मात केली. घर सोडल्यानंतर जगण्याची भ्रांत असूनही त्यांनी संसार फुलविला आणि मुलांना शिक्षण देऊन समाजात प्रतिष्ठा कमाविली. प्रेमात कधीही धर्म किंवा जात आड येऊ नये असाच संदेश त्यांनी या ‘प्रेमाच्या दिवसा’निमित्त सर्वांना दिला आहे.
मीनल जोशी यांनी पती आशिष मिरपगार यांच्याशी विवाह केला. सिंहगड रोड या ठिकाणी राहणाऱ्या दांपत्याच्या विवाहाला २६ वर्षे झाली आहेत. पतीच्या घरून विरोध नव्हता. परंतु, मीनल यांच्या घरातून काहीसा विरोध झाला. त्यांचा १९९६मध्ये विवाह झाला. दोघेही कमावते होते. त्यातूनच त्यांचे प्रेम फुलले. आता त्यांना दोन मुलं आहेत. त्यातील एक अभियंता व दुसरा दहावीमध्ये शिकत आहे. विवाहाच्या दरम्यान कुटुंबाची समजूत घालावी लागली. मोठ्या भावाने त्यांना विवाहासाठी पाठिंबा दिला. मर्जीने लग्न केल्याने घर उभे करण्यापासून त्यांची सुरुवात होती. कर्ज काढून घर घेतल्याने संसारात चणचण जाणवत होती. परंतु, कष्टातून पुढे सर्व त्यांनी सर्व साकार केले. लग्नानंतर काही वर्षांत विरोध विरला. त्यानंतर, सर्वांनी त्यांना स्वीकारले.
---
परंपरा कायम
माझ्या वैवाहिक आयुष्याला ३० वर्ष झाली. पती उत्तम सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. आमचा १९९१मध्ये विवाह झाला. सासरच्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही. २० वर्षांनी सासरची मंडळी माझ्या व कुटुंबासोबत बोलत आहेत. लग्नाला सासरचे कोणीही आले नव्हते. माझे वडील मुख्याध्यापक होते. ते म्हणाले, ‘जात ही कोणाच्या कपाळावर लिहून येत नाही.’ त्यामुळे, त्यांनी आळंदीत लग्न लावून दिलं. माझा मुलगा अमरचाही सोलापूरला राहणाऱ्या प्राजक्ता सलवारून हिच्यासोबत प्रेमविवाह झाला आहे. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की, आंतरजातीय विवाहासाठी आम्ही काही करू शकलो.
- शुंभागी घनवट, चिंचवड
---
माझ्या पहिल्या पतीचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले. मुलगा लहान होता. मी नोकरी करत होते. दुसऱ्या विवाहाचं डोक्यात नव्हतं. नोकरीच्या शोधात असताना अमित मुजूमदार यांच्यासोबत ओळख झाली. पतीच्या निधनानंतर मी सावरले नव्हते. दोघांचा स्वभावही जुळला. त्यांनी माझ्या मुलाची जबाबदारी घेतली. त्यांच्या घरच्यांचा प्रचंड विरोध झाला. प्रचंड वाद झाले. लग्न होऊन १० वर्षे झाली आहेत. आम्ही सोबत राहणार नाही असे अनेकांनी सांगितले. मात्र, आता मला एक मुलगी आहे. मोठा मुलगा २१ वर्षाचा आहे. आम्ही सगळे कुटुंब आनंदी आहे. मुलासाठी आणखी एक घर खरेदी केलं आहे. ते प्रेमाच्या दिवसानिमित्त त्याला गिफ्ट केलं आहे.
- सिल्विया मुजूमदार, दळवीनगर, चिंचवड
---
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..