
गुन्हे वृत्त
चोरलेल्या धनादेशावर डॉक्टरची बनावट सही करून अपहार
पिंपरी, ता. २७ : रुग्णालयातील मेडिकलमधून धनादेश चोरला. त्यावर डॉक्टरची बनावट सही करून अपहार केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखलीतील शिवतेजनगर येथील गुंजकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे घडला. याप्रकरणी दिगंबर मारोतराव गुंजकर (रा. सेक्टर क्रमांक ११, स्पाईन रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी महिला एप्रिल २०२१ ते जून २०२१ या कालावधीत गुंजकर रुग्णालयात नोकरी करीत होती. तिला नोकरीवरून काढल्यानंतर देखील ती वेळोवेळी रुग्णालयात येत होती. दरम्यान, आरोपीने रुग्णालयाशी संलग्न असलेल्या आरोही मेडिकल अँड जनरल स्टोअर्समधील धनादेश पुस्तक चोरले. त्यातील चार धनादेशावर फिर्यादी यांचा मुलगा डॉक्टर जयकर यांची बनावट सही करून ५८ हजार पाचशे रुपयांचा अपहार केला. यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कॅशबॅकच्या नावाखाली महिलेची फसवणूक
फोन पेवर कॅश बॅक आल्याचे सांगून ते परत बँक खात्यात पाठविण्यासाठी महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर महिलेच्या खात्यातून एक लाख ८८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेत महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला फोन केला. तुम्हाला फोन पे चा कॅश बॅक आला असून तो तुम्ही रिसिव्ह केलेला नाही, असे सांगत कॅश बॅक ट्रान्सफर करण्यासाठी फिर्यादीच्या बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने माहिती दिली. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यात एक लाख ८८ हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फिर्यादीची फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या नावावर एका बँकेतून क्रेडिट कार्ड घेत त्यावर खरेदी करून त्यांना चार हजार ९२० रुपयांचे व्याज भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कोयता बाळगल्याप्रकरणी डांगे चौकात एकाला अटक
बेकायदा कोयता बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई डांगे चौक येथे करण्यात आली. अबिद मुजाहीहद शेख (वय २३, रा. खडी मशीनजवळ, चांदखेडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे कोयता असल्याची माहिती पथकाला मिळाली . त्यानुसार त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कासारसाईत मोटार पेटवली
रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारीला आग लावून नुकसान केल्याची घटना कासारसाई येथे घडली. यामध्ये मोटारीचे नुकसान झाले. याप्रकरणी निखिल अनिल कांबळे (रा. कासारसाई ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (ता.२४) फिर्यादी यांची मोटार कासारसाई येथील कोळीवाडा येथे लॉक करून उभी होती. दरम्यान, अज्ञात आरोपीने मोटारीला आग लावली. यामध्ये मोटारीचे दोन टायर, इंजिनचा भाग, आतील कुशन, दरवाजा जळाला. यामध्ये मोटारीचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..