
महाशिवरात्रीनिमित्त महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन
पिंपरी, ता. २८ : महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन, महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरांना फुलांची सजावट करण्यासह रोषणाई केली आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. काही मंदिरांत चार -पाच दिवसांपासूनच हरिनाम सप्ताह तसेच शिवलीला कथा पठण सुरु झाले आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल. महापूजा, अभिषेक, महाआरती भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांसह महाप्रसाद वाटप होईल
शहरात प्राचीन शिवालयासह विविध मंदिरे आहेत. चिंचवडगावातील धनेश्वर मंदिर, पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर यासह रावेत गावठाण, आकुर्डी, निगडी प्राधिकरण, चिखलीगाव, म्हेत्रे वस्ती, देहूतील सिद्धेश्वर मंदिर, मोशीतील गायकवाड वस्ती, देहू-आळंदी रोड, भोसरी गावातील लांडगे आळी, निगडी, दापोडी, पिंपरी, काळेवाडी, तळवडे तसेच कासारवाडीतील शंकरवाडी आदी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भक्तिगीते कानावर पडत असून परिसरातील वातावरणही प्रसन्न झाले आहे. मंदिर परिसरात हार फुलांची दुकाने सजली आहेत. यासह मिठाई व खेळण्यांचीही दुकाने थाटली आहेत.
दरम्यान, देहूरोडजवळील घोरावडेश्वर डोंगरावरील प्राचीन मंदिरातही विविध कार्यक्रम होणार आहेत. येथे देहूरोड परिसरासह पिंपरी-चिंचवड व तळेगाव, वडगाव, लोणावळा आदी ठिकाणचे भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे हरिनाम सप्ताह सुरु असून पोलिस बंदोबस्तासह पार्किंग व दर्शनबारीची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..