
गुन्हे वृत्त
पार्सलमध्ये लॅपटॉपऐवजी
पाठवले मिठाचे पुडे व कागद
पिंपरी, ता. १ : ऑनलाइन लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्याचे पार्सल घरी आले. मात्र, पार्सलमध्ये लॅपटॉपऐवजी मिठाचे पुडे व कागद पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी डॉ. जना प्रणीत जोशी (रा. सुखवानी कॅम्पस, वल्लभनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ॲमेझॉन कंपनीतील अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. १० फेब्रुवारीला फिर्यादी यांच्या पतीने ६३ हजार ९९० रुपये किमतीचा लॅपटॉप ॲमेझॉन इंडिया या कंपनीतून ऑनलाइन खरेदी केला. त्यानंतर ॲमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी एजंटने लॅपटॉप म्हणून दिलेले पार्सल उघडून पहिले असता, त्यामध्ये लॅपटॉपऐवजी दोन किलो मिठाच्या पुड्या व खाकी कागद होता. लॅपटॉपचा अपहार करून फिर्यादी व त्यांच्या पतीची ॲमेझॉन कंपनीतील अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तळवडेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना तळवडे येथे घडली. पांडुरंग दत्तात्रेय कोकाटे (वय ६०, रा. सुतारवाडी, शिवनगर, पाषाण) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी निखिल पांडुरंग कोकाटे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बसचालकावर गुन्हा दाखल झाला. पांडुरंग कोकाटे हे त्यांच्या दुचाकीवरून चाकणकडे जात होते. तळवडेतील कॅनबे चौकातून पुढे गेल्यानंतर नदीच्या पुलाकडे वळण घेत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कोकाटे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
माणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
चॉकलेट खायला देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार माण येथे घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्यानुसार ग्यानरंजन ऊर्फ मंगू ताडू (वय १९, रा. माण, मूळ- उडीसा) याच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपी हा पीडित मुलीच्या वाढदिवसाला चॉकलेट घेऊन आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीचे आई-वडील व भाऊ काही कामानिमित्त बाहेर गेले असताना आरोपी पुन्हा त्यांच्या घरी आला. त्यावेळी घरी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ होता. आरोपीने दोघांनाही चॉकलेट खायला दिले. मुलगी झोपल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही वेळोवेळी मुलीशी शारीरिक सबंध ठेवले. यामध्ये पीडित मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.