
पोलिस भरती प्रक्रिया; गैरव्यवहार प्रकरणी सात उमेदवारांवर गुन्हा
पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सात उमेदवारांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अर्जुन छोटीराम जारवाल, प्रताप मोहन सुलाने, जगदीश पन्नुगुसिंगे, रणजीतसिंग मदनसिंग महेर, सचिन विष्णू गुसिंगे, सुरेश वाल्मिक गोमलाडू, संदीप रेवप्पा होवाळे, अशी गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस भरती सेलचे उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर कागदपत्र पडताळणी व मैदानी, शारीरिक चाचणी झाली. सोमवारी (ता. २८) या भरतीची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेदरम्यान १९ नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत लेखी परीक्षा क्रमांक, चेस्ट नंबर असलेल्या या सात उमेदवारांनी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबत पडताळणी समितीतील सदस्यांचीही खात्री पटली असून याबाबतचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आरोपींनी गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.