
पुनावळेत कंटेनरला मोटार धडकून महिलेचा मृत्यू
पिंपरी, ता. १ : भरधाव कंटेनर रस्त्यात अचानक थांबल्याने मागून येणारी मोटार कंटेनरला धडकली. यामध्ये मोटारीतील महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीसह दोन मुले जखमी झाले. ही घटना पुनावळे येथे घडली.
प्रज्ञा कैलास उपरे (वय ३२, रा. तळेगाव-दाभाडे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पती कैलास तुळशीराम उपरे (वय ३५) तर मुलगा आयुष (वय १०), आदित्य (वय ७) हे जखमी झाले आहेत. कैलास हे तळेगाव दाभाडे येथील एका खासगी कंपनीत कामाला असून ते कुटुंबासह तळेगाव येथे राहतात. उपरे कुटुंबीय मोटारीतून कराड येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते तळेगाव येथे परत घरी येत होते. दरम्यान, सोमवारी (ता. २८) पहाटे चारच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर पुनावळे येथे लकी हॉटेलसमोरील रस्त्याने पुढे जाणारा कंटेनर अचानक थांबला. त्यामुळे मोटार कंटेनरवर आदळली. यात गंभीर जखमी झाल्याने प्रज्ञा यांचा मृत्यू झाला. तर, कैलास यांच्यासह दोन्ही मुले जखमी झाली. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी कैलास उपरे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.