भाजप वचननामा प्रसिद्ध

भाजप वचननामा प्रसिद्ध

१३५६३
लोकसहभागातून विकास करणार
चंद्रकांत पाटील; नदी प्रदूषण रोखण्यासह ई बसेसवर भाजपच्या वचननाम्यात भर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः नदी प्रदूषण रोखणे, ई बसेस, पाईपद्वारे गॅस, घनकचरा आणि सांडपाणी निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना यांसाठी केंद्र सरकारचा निधी उपयोगात आणून या गोष्टी प्रत्यक्षात उतरवू. लोकसहभागातून शहर सुशोभित करू, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते आज भाजपच्या वचननाम्याचे प्रकाशन केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘राज्यात भाजपचे सरकार नाही. त्यामुळे भाजप उमेदवार निवडून आले तरी निधी कुठून आणणार असा सूर विरोधक आळवत आहेत; पण त्यांना हे माहिती नाही की केंद्राच्या अनेक योजना आणि उपक्रम शहरात राबवता येतात. त्यासाठीच वचननाम्याच्या माध्यमातून शहर विकासासाठीची भूमिका स्पष्ट केली आहे. नदी प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारची योजना असून त्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी आणता येऊ शकतो. घनकचरा हा महापालिका उत्पन्नाचे साधन बनू शकतो. त्यासाठीही केंद्राचा निधी उपलब्ध आहे. सुसज्ज मैदान, उत्तम दर्जाची नाट्यगृहे, बागा, आयलॅंडचे सुशोभीकरण, पर्यटनस्थळांचा विकास या गोष्टी लोकसहभागातून होऊ शकतात. त्यामुळे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना निवडून देणे म्हणजे शहर विकासाचे नवे पर्व सुरू झाल्यासारखे आहे.’’
भाजप नेत्या चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, धनंजय महाडिक, शौमिका महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कुटुंब म्हणजे काय...
कोल्हापुरात कार्यकर्ते नसल्याने पुण्यातून कार्यकर्ते आणले आहेत, असा आरोप सतेज पाटील यांनी केला होता. त्यावर पाटील म्हणाले, ‘‘भाजप एक कुटुंब आहे. आम्ही कुठेही असू पण घरात लग्नकार्यासाठी जसे सगळे एकत्र येतात तसे निवडणुकीसाठी एकत्र आलो आहोत. कुटुंब, नाती म्हणजे काय हे सतेज पाटील यांना कळणार नाही.’’


हे केले
अमृत योजनेतून पाणीपुरवठा, सांडपाण्यासाठी निधी
शहरांतर्गत कामासाठी १०० कोटींचा निधी
सीपीआर, वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० कोटी
चित्रनगरीत विविध सुविधांसाठी निधी
शास्त्रीनगर मैदानासाठी ३ कोटी
शहरात काही भागात पाईपलाईनद्वारे गॅस

हे करणार
सर्व मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड
रस्ते अर्बन डिझाईनप्रमाणे बनवणार
शहरातील चौकांचे सुशोभीकरण.
बांधकाम परवान्यासाठी एक खिडकी
मैदाने विकसित करणार.
प्रत्येक चौकात ई-चार्जिंग

राऊतांचे तेल ओतण्याचे काम
संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेत आग लावून तेल ओतण्याचे काम केले. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी तीन वेळ सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीनंतर ते यशस्वी झाले. हिंदू मतांची विभागणी केली. हिंदू मतांची खरीच काळजी असेल तर दोन दिवसांत मातोश्रीवरून निरोप येईल.

काँग्रेसची डबल ढोलकी
हद्दवाढ म्हणजे काँग्रेससाठी डबल ढोलकी आहे. पालिकेची निवडणूक आली की म्हणायचे हद्दवाढ करणार. जिल्हा परिषदेची निवडणूक आली की म्हणायचे हद्दवाढ होणार नाही. त्यांच्यासाठी हद्दवाढ म्हणजे डबल ढोलकी आहे. हद्दवाढीत आधी कोणती पाच गावे घेणार त्यांची नावे जाहीर करा, असे पाटील म्हणाले.

आघाडीमुळे अनागोंदी
आघाडीमुळे राज्यात आनागोंदी आहे. राज्याच्या ६० वर्षंच्या इतिहासात असे कधी झाले नाही. एफआरपीचे तुकडे करणारे हे सरकार शेतकरीविरोधी आहे. आडमुठ्या धोरणामुळे इंधनाचे कर कमी केले नाहीत. तुलनेत राज्यात पेट्रोल महाग आहे. जनतेचा हा रोष कोल्हापुरातील मतदानातून दिसेल, असे माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्प
‘सकाळ’ने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी बातम्यांसह लेख यांच्याबरोबरच प्रबोधनाचे उपक्रम घेतले जात आहेत. परिणामी भाजपने वचननाम्यातही पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यचा संकल्प केला आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुराची तिव्रता कमी करण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्गावरील पुलाबाबत उपाययोजना करण्याचेही वचननाम्यात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com