मेट्रोच्या कंत्राटी कामगारांचा महिन्याचा पगार रखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune metro
मेट्रोच्या कंत्राटी कामगारांचा महिन्याचा पगार रखडला

मेट्रोच्या कंत्राटी कामगारांचा महिन्याचा पगार रखडला

पिंपरी - मोठा गाजावाजा करून सुरू झालेली मेट्रो (Metro) आता दीड महिन्यातच हातघाईला आली आहे. सुरुवातीला मनोरंजन म्हणून प्रतिसाद मिळाला, परंतु; आता प्रवासी (Passengers) संख्या घटू लागली आहे. त्यात मेट्रोकडे काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांचा (Contract Worker) एका महिन्याचा पगार (Salary) रखडला आहे. त्यामुळे अनेक कामगार व पिंपरीतील चार सुपरवायझर सोडून जाऊ लागले आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रोचे सहा मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईने उद्घाटन करण्यात आले. वनाज ते गरवारे महाविद्यालय ४.३५ किलोमीटर व फुगेवाडी ते पिंपरी सहा किलोमीटर हे दोन मार्ग प्राथमिक स्वरूपात सुरू करण्यात आले. सुरुवातीला मनोरंजन व उत्सुकता म्हणून अनेकांनी प्रवास केला. परंतु; महिन्यातच मेट्रोची प्रवासी संख्या ९० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी उत्पन्नात घट होऊ लागली आहे. मेट्रोमुळे वेळ आणि पैसा वाचावा तसेच प्रवास सुखकर व्हावा, यासाठी हा प्रकल्प आहे. मात्र, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

‘ग्रेट वॉल’ ठेकेदाराचा घोळ...!

मेट्रोकडे ठेकेदार म्हणून काम करीत असलेल्या ‘ग्रेट वॉल’ या कंपनीकडे ४५० साफसफाई कामगार व सुरक्षा रक्षक, कार्यालयीन कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. यातील बहुतांश कामगारांना गेला महिना पगारच मिळालेला नाही. त्यामुळे चार सुपरवायझर व अनेक कामगार नोकरी सोडून निघून गेले आहेत. यातील बहुतांश कामगार हातावर पोट असणारे परप्रांतीय आहेत. कामगारांना याचा ठेका वडिलांकडे असताना वेळेत पगार होत होता मात्र, सध्या मुलाकडे काम आल्यापासून पगार होत नाहीत, असे एका कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

‘मेट्रो कामगारांना मार्चपर्यंतचा पगार मिळालेला नाही. जीएसटीचा प्रश्‍न असल्याने त्यांचे पगार रखडले होते. रविवारपासून (ता. २४) पगार देणे सुरू झाले आहे. मंगळवारपर्यंत सर्वांचे पगार दिले जातील.’

- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, पुणे मेट्रो

कामगार स्थिती

- साफसफाई कामगार, सुरक्षारक्षक, अन्य कर्मचारी दोन महिने पगाराविना

- सुमारे ४५० कामगारांचा प्रश्‍न

- हातावर पोट असणारे कामगार परप्रांतीय

- परिस्थिती आटोक्यात आणण्याचा मेट्रोचा प्रयत्न

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top