पिंपरी चिंचवड मेट्रो धावणार कधी याविषयी ब्रिजेश दीक्षित यांचे मौन

पिंपरी चिंचवड मेट्रो धावणार कधी याविषयी ब्रिजेश दीक्षित यांचे मौन

पिंपरी, ता. ४ : गेल्या वर्षी कोरोनामुळे मेट्रोच्या कामाच्या प्रगतीत बराच खंड पडल्यानंतर नवीन वर्षांत मेट्रोतून सफर करण्याचे स्वप्न सर्वसामान्यांनी पाहिले. मेट्रो पूर्ण होण्याच्या दिशेने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सहा किलोमीटरच्या प्राधान्य मार्गावर मेट्रोची वारंवार चाचणी झाली. पण, डिसेंबर २०२० अखेरीसपर्यंत पूर्ण वर्षभरातील मेट्रोचा मुहूर्त हुकला. सध्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय श्रेय लाटण्यापोटी मेट्रोचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. मेट्रो धावणार असल्याच्या केवळ चर्चा आणि बैठकाच होत असून प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मेट्रोत बसण्यासाठी नागरिकांना महामेट्रोकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो स्टेशन संत तुकाराम नगर स्टेशनचा पाहणी दौरा महामेट्रोतर्फे (ता.चार) सकाळी दहाला आयोजित केला होता. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनबद्दल माहिती देण्यात आली. या स्टेशनबद्दल माहिती सांगण्यासाठी तसेच पत्रकारांशी संवाद साधण्याच्या हेतूने महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशनच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन जुना जकात नाका, फुगेवाडी या ठिकाणी करण्यात आले. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कार्यकारी संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, ऑपरेशन्स आणि सिस्टिमचे कार्यकारी संचालक विनोद अग्रवाल पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

दीक्षित म्हणाले, ‘‘कोरोनामुळे अनेक दिवस निर्बंध होते. त्यामुळे मेट्रो धावण्यास विलंब झाला. मेट्रोच्या एका किलोमीटरसाठी तिकीट दर १० रुपये असणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट तिकीट दर ५० रुपये असणार आहे. त्यानंतर जशा प्रकारे अंतर वाढेल, तेवढ्या प्रमाणात तिकीटदर कमी केले जाणार आहेत. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी महिना पास सेवा उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात मेट्रोचे ८२ किलोमीटरपर्यंतचे डीपीआर प्रस्तावति असून त्यामध्ये निगडी मेट्रोचा समावेश आहे. ते लवकरच प्रस्तावित होइल. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने मेट्रो सुरु करण्याचे लवकरच कळविले जाईल. १५ जानेवारी २०२२ पर्यंत मेट्रोचे कामकाज पुर्णपणे होणार आहे. ’

तसेच, पुणे विमानतळापर्यंत मेट्रो, मेट्रो सुरक्षा, टीओडीच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, रॅपिड ट्रेन, मेट्रो सेवा सुविधा, वॉटर मेट्रो तसेच इतर सेवा सुविधांविषयी त्यांनी माहिती दिली. नाशिक फाटा या ठिकाणी कामगार मृत्यू झाल्याबद्दल गाडगीळ यांनी रस्ता सुरक्षेला जबाबदार धरले. मेट्रोच्या कामकाजादरम्यान हा मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा फज्जा
दीक्षित नागपूरमध्ये काही कामानिमित्त असल्याने त्यांनी पत्रकार परिषद व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. त्यातच महामेट्रो जनसंपर्क महाव्यवथापक कोविड पॉझिटिव्ह असल्याने ते देखील ऑनलाइन होते. दीक्षित यांना आवाज स्पष्ट जात नसल्याने मेट्रोच्या कामकाजाविषयी त्यांना स्पष्टपणे उत्तरे देता आले नाही. त्यामुळे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेची घाइ का करण्यात आली हा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, मेट्रो कधी धावणार याविषयी त्यांनी केंद्र आणि राज्याच्या होकारानंतर समजेल असे सांगितले.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com