महावीरांच्या जयघोषाने दुमदुमली कामगारनगरी
पिंपरी, ता. १४ : कोरोनाच्या संकटानंतर शहरात अहिंसेचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान महावीर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दिगंबर जैन व श्वेतांबर जैन बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ''त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की'', ‘अहिंसा परमोधर्म की जय, वंदे विरम भगवान महावीर स्वामी की जय’, अशा आवेशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. शहरात यानिमित्त शोभा यात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. जैन मंदिरात साधू-साध्वींची भगवान महावीर यांच्या जीवनावर प्रवचने झाली. शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
दरवर्षी मोठ्या उत्साहात दिगंबर जैन व श्वेतांबर जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मोत्सव कल्याणक सोहळा साजरा केला जातो. मात्र, मागील दोन वर्षांपासून सर्व धार्मिक उत्सव कोरोना संसर्गामुळे रद्द करावे लागले. यावर्षी मात्र सकाळीच जैन मंदिरांमध्ये भगवान महावीरांची मनोभावे पूजा करण्यात आली. महामंत्र पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंदिराच्या आतील बाजूला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर जैन मंदिरापासून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल्या सुशोभित पालखीतून सवाद्यसह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सनई-चौघडा, नगारा, बॅण्ड पथक, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेली लहान मुले-मुली, पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व केसरी-पिवळ्या-लाल साड्या परिधान केलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची प्रतिमा असलेला पालखी मिरवणुकीत होती. काही ठिकाणी महावीरांची रथयात्रा काढून त्यांनी दिलेल्या शिकवणीची माहिती लोकांना देण्यात आली. मिरवणूक मार्गावर विविध मंडळे व जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. ''त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की'' अशा घोषणा देण्यात आल्या. चौकाचौकात भाविकांना पिण्याचे पाणी, प्रसादाचे वाटप करण्यात आले. चिंचवड गावात श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, महावीर स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, कल्याण प्रतिष्ठान, श्री जैन सेवा मंडल, प्लॅटिनम फॅमिली ग्रुप, जय आनंद पदयात्रा, जैन सोशल ग्रुप व सकल चिंचवड जैन समाज यांच्या वतीने ठिकठिकाणी निबंध स्पर्धा, प्रश्नमंच स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, संगीत संध्या, रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.
‘महावीर की रोटी''
भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भोसरी, आळंदी, डांगे चौक येथे ‘महावीर की रोटी''चे आयोजन करण्यात आले. या वेळी निखिल शरदकुमार लुणावत यांनी अन्नदानाच्या माध्यमातून गरजूंना जेवण देण्यात आले. त्यानंतर अहमदनगरमधील मिरी गो माता शाळेला मदत करण्यात आली. आदिनाथ स्थानक पुण्यातून श्रावक राजेश ताथेड यांनी ‘अहिंसा दौड’ काढली.
मिरवणुकीला सुरुवात
या मिरवणुकीला चिंचवड-गांधीपेठ येथील जैन मंदिरापासून सकाळी सात वाजता प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पोस्ट ऑफिस, चापेकर चौक, गांधी पेठ, भोई आळीपासून केशवनगरमधील कल्याण प्रतिष्ठान येथे मिरवणुकीचा समारोप झाला. भगवान महावीरांचा जयघोष करत अनेक जैन बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जैन साधू गुरुनिश्रीजी यांनी ''आवो जाने महावीर को'' या विषयावर प्रवचन दिले. रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नेहरूनगर, संत तुकाराम नगर येथील जैन मंदिराच्या वतीने भक्तिमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली
अहिंसा रॅलीचे स्वागत
शहरातून जैन बांधवांनी अहिंसा रॅलीचे आयोजन केले होते. थेरगाव जैन स्थानकातून या रॅलीची सुरवात झाली. काळेवाडी, पिंपरी, लिंक रोड, चिंचवड गाव, बिजलीनगर, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड स्टेशन भागातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे स्वागत
करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली. तानाजी नगर येथे जितो चिंचवड-पिंपरी शाखेच्या वतीने रॅलीचे स्वागत केले. रॅलीत
सहभागी झालेल्या बांधवांना पाणी व शीतपेयांचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.