
रुग्ण आढळताहेत, पण, गंभीर नाही
पिंपरी, ता. १० ः कोरोना प्रतिबंधक नियम राज्य सरकारने एक एप्रिलपासून शिथिल केले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत अर्थात गेल्या दहा दिवसांत ९९ रुग्ण आढळले आहेत. मात्र, ते गंभीर नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. रविवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७१ रुग्ण गृहविलगीकरणात होते. शहराबाहेरील एकही रुग्ण सध्या शहरात दाखल नाही.
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि गंभीर व व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्याही घटल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्मक नियम शिथिल केले आहेत. शहरातील खाजगीसह महापालिकेच्या रुग्णालयांत सध्या एकही रुग्ण नाहीत. मात्र, कोरोना पूर्णपणे गेलेला नसल्याचे गेल्या दहा दिवसांतील आकडेवारीवरून दिसून आले. कारण, गेल्या दहा दिवसांत ९९ रुग्ण आढळले आहेत. त्यापूर्वीच्या सात दिवसांत आणि नंतरच्या तीन दिवसांत आढळलेल्या रुग्णांसह गेल्या दहा दिवसांत १०८ जण बरे झाले आहेत. शिवाय, या दहा दिवसांत कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही शहरासाठी दिलासादायक बाब आहे.
नवीन सहा रुग्ण
कोरोना संसर्ग झालेले सहा रुग्ण रविवारी (ता. १०) शहरात आढळले, तर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत तीन लाख ५९ हजार ३१९ जणांना संसर्ग झाला असून तीन लाख ५५ हजार ३५५ जण बरे झाले आहेत. चार हजार ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ३५ लाख ३१ हजार ५६२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज २७ घरांतील ८९ नागरिकांची तपासणी केली. सध्या पाच मेजर व २५४ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
---
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..