‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रमामुळे 
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

Published on

ऊर्से, ता. २ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडी (बौर) येथे विद्यार्थ्यांची उपस्थिती, उत्साह आणि शाळेबद्दलची आवड वाढावी यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्यात ‘दप्तरमुक्त शाळा’ हा अनोखा उपक्रम राबविला जात असल्याने यामुळे विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढली असून, त्यांच्यात आत्मविश्वासही बळावला आहे. शनिवार हा ‘दप्तरविना शाळा’ असल्याने या दिवशी अनेक उपक्रम घेतले जात आहेत.

नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम
मुख्याध्यापक तानाजी शेखरे आणि उपक्रमशील शिक्षिका मैना सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सरस्वती रोळे, पौर्णिमा वाईकर, पल्लवी गायकवाड आणि इतर शिक्षक मंडळी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवत आहेत. शनिवारच्या दिवशी विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अनुभवात्मक पद्धतीने अभ्यास करून दिला जातो. नैसर्गिक रंगांची निर्मिती, भारतातील विविध राज्यांतील पेहराव आणि आहार, थोर महिलांचा परिचय, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, ‘गुड टच – बॅड टच’ यांसारख्या जीवनकौशल्यांवर आधारित माहितीपट दाखवले जातात.

संस्कृतीशी नाळ जुळवणारे उपक्रम
भारतीय संस्कृतीची ओळख घडवण्यासाठी ‘बाल दिंडी’, आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी, विठ्ठल-रखुमाई वेशभूषा, रिंगण सोहळा आणि वारकरी खेळांचे आयोजन केले जाते.

शेती व व्यावसायिक अनुभव
मावळ परिसरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भातशेतीचा अनुभव देण्यासाठी मुलांकडून भात लागवड करून घेतली जाते. मुलेही उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. तसेच व्यावसायिक कौशल्य विकासासाठी स्थानिक व्यावसायिकांकडे भेटी दिल्या जातात. तसेच, विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेत आमंत्रित करून मुलांकडून त्यांचे पाद्यपूजन करून घेतले जाते, ज्यामुळे मुलांमध्ये आदराची भावना वाढीस लागते. तसेच विद्यार्थ्यांना लोकशाही कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी गुप्त मतदान प्रक्रिया राबवली जाते.
या सर्व उपक्रमांमुळे मुलांसाठी शिकणे अधिक रंजक झाले आहे. शिक्षकांच्या मते, शनिवारचा दिवस दप्तरविना असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची ओढ निर्माण होत असल्याचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com