रिंगरोड, टीपी स्कीमला धामणे ग्रामस्थांचा विरोध
ऊर्से, ता. १२ : परंदवडी, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे आणि नेरे या पाठोपाठ धामणे गावातील शेतकऱ्यांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित नगररचना (टीपी) आणि रिंगरोडला विरोध केला आहे. याबाबत पद्मावती मंदिरात सोमवारी (ता.११) झालेल्या विशेष ग्रामसभेत त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. तसेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या.
धामणे येथे ‘पीएमआरडीए’मार्फत ६५ मीटरचा रिंगरोड आणि नियोजित दोन टीपी स्कीम प्रस्तावित आहेत. याबाबत झालेल्या ग्रामसभेत चर्चा झाली. हे दोन्ही प्रकल्प अन्यायकारक असल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत ते रद्द करण्याचा ठराव संमत केला. या संबंधीचे निवेदन आणि ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त यांना पाठविण्याचे ठरले.
ग्रामसभेस सरपंच अश्विनी गराडे, उपसरपंच रेखा लोहोर, सदस्य अविनाश धोंडिबा गराडे, अविनाश गराडे, प्रदीप गराडे, सोमेश गराडे, दीपाली गराडे, सारिका गराडे, ॲड. अंजना आढाळगे, ग्रामपंचायत अधिकारी विराज पवार, नंदकुमार गराडे, पप्पू गराडे, अरुण गराडे, बाबुलाल गराडे, नंदकुमार गराडे, अतुल गराडे, आनंदा गराडे, माजी सैनिक दत्तात्रय गराडे, सतीश गराडे, गणेश गराडे, रवींद्र गराडे, तुषार गराडे आदी उपस्थित होते.
शासन शेतकरी विकासाच्या दृष्टीने काम करत असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करू. पण, कुठलीही योजना आमच्यावर लादली; तर तिला विरोध असून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
- अविनाश मनोहर गराडे, माजी सरपंच
कासारसाई साखर कारखान्याला सर्वाधिक २० हजार टन ऊस धामणे गावातून जातो. तसेच गावाला कृषीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे टीपी स्कीमला तीव्र विरोध आहे.
- बाबूलाल गराडे, शेतकरी
म्हाळुंगे येथील शेतकऱ्यांची टीपी स्कीमबाबत अवस्था झाली, तशी आमची व्हायला नको. त्यामुळे या योजनेला आमचा विरोध असणार आहे
- नंदकुमार गराडे, शेतकरी
टीपी स्कीम आणि रिंगरोडमध्ये माझे घर व शेती जाणार आहे. त्यामुळे मी भूमिहीन होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांना माझा विरोध आहे.
- अतुल गराडे, शेतकरी
हे दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांवर लादले जात आहेत. गावाजवळचे सर्व क्षेत्र संपादित केले जाणार असल्याने गावपण राहणार नाही. त्यामुळे या योजनांना आमचा विरोध आहे.
- दत्तात्रय गराडे, शेतकरी
BBD25B03333