
चक्रपणीमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा
भोसरी, ता. १६ ः चक्रपाणी वसाहतीतील काही भागात दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या परिसरात बुधवारी (ता.१५) वॉश आउट केले. नादुरुस्त पाइप लाइनचीही दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सोमवारी (ता.१३) ते बुधवारपर्यंत (ता.१५) भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील हनुमान कॉलनी, शास्त्री चौक, पसायदान कॉलनी, गाडगेमहाराज सोसायटी, जय महाराष्ट्र चौक आदी भागातील सुमारे चारशे घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. बुधवारी या परिसरात पाण्याचा दिवस असल्याने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हुतात्मा चौकाजवळील पाण्याच्या वाल्व्हचे वॉश आउट केले. त्याचप्रमाणे चक्रपाणी वसाहतीतील बॅडमिन्टन हॉलजवळील ड्रेनेजजवळच्या नळाच्या गंजलेल्या पाण्याच्या पाइप लाइनचीही दुरुस्ती केल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता विजय लाडे यांनी दिली. त्यामुळे बुधवारी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले.
नागरिकांची मागणी ः
चक्रपाणी वसाहतीला पांजरपोळमधील पाण्याच्या टाकीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी भरण्यासाठी मोटारच लावावी लागते. नागरिकांनी मोटारी बंद केल्यावर वसाहतीच्या शेवटच्या भागांमध्ये पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. ही समस्या तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.