‘एमआयडीसी’त सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

‘एमआयडीसी’त सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

भोसरी, ता. २ : भोसरी एमआयडीसीत सीसीटीव्हीचा अभाव... अनधिकृतपणे वाढलेली भंगारांची दुकाने...पत्रा शेड व टपऱ्यांचे अतिक्रमण....त्यात होणारे अवैध धंदे...चौकात पुरेशा विजेच्या दिव्यांचा अभाव...त्याचा फायदा घेत रात्रीच्या वेळेस होणारी लूटमार...गुन्ह्यातून तुरुंगाच्या बाहेर येणाऱ्या चोरट्यांकडून पुन्हा चोऱ्यांचे सत्र...यामुळे भोसरी एमआयडीसीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अनधिकृत भंगार दुकाने
पूर्वी भोसरीत संघटित टोळ्यांचे पेव फुटले होते. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे लघुउद्योजकांचे म्हणणे आहे. भोसरी एमआयडीसीमध्ये एकूण २२ ब्लॉक आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये चार-पाच भंगारांची दुकाने अनधिकृतपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे भुरट्या चोरट्यांना चोरीचा माल विकण्यासाठी सोय झाली आहे. त्यामुळे कंपनी परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीमध्ये जागोजागी अनधिकृत पत्रा शेड व टपऱ्यांची वाढल्या आहेत. बऱ्याच वेळा या शेडचा उपयोग अवैध कामासाठी केला जातो. त्याचप्रमाणे दारुडेही याचा उपयोग करतात. रात्रीच्या वेळेस एखादा कामगार एकटा आढळल्यास त्यास धमकावून, मारहाण करून लुटलेही जाते त्यामुळे भोसरी एमआयडीसीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


चोरीवर अंकुश कसा मिळवावा
- रात्रीच्या वेळेस पोसिसांद्वारे गस्त वाढविणे
- एमआयडीसी परिसरात सीसीटीव्हीचे जाळे उभारणे
- अनधिकृत टपऱ्या, शेड, भंगाराची दुकाने यावर कारवाई करणे
- वारंवार चोरीच्या गुन्ह्यात सापडणाऱ्या चोरट्यांवर कडक कारवाई करणे
- चोरी झाल्यावर लघुउद्योजकांनी तक्रारींची पोलिस ठाण्यात तातडीने दखल घेणे

विधी संघर्ष बालके गुन्हेगारीकडे
भोसरी एमआयडीसी परिसरात काही व्यसनाधीन आणि विधी संघर्ष मुले भुरट्या चोऱ्या करीत असल्याचे लघुउद्योजक आणि पोलिसांचे म्हणणे आहे. चोरी झाल्यावर लघुउद्योजक पोलिसांना माहिती देतात. मात्र, छोटी चोरी आहे म्हणून तक्रार दाखल करत नाहीत. गुन्हेगार अल्पवयीन असल्याने दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेही गुन्हेगारांचे फावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

भोसरी एमआयडीसीमध्ये वर्षानुवर्षे चोरी करणारे चोरटे तेच आणि त्यांची टोळीही तीच आहे. चोरटे तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा एमआयडीसी परिसरात चोऱ्या करण्यास सुरुवात करतात. चोरट्यांच्या त्रासाला घाबरून लघुउद्योजक चोरीची पोलिसांत तक्रार दाखल करत नाहीत. मात्र, वारंवार चोरीच्या घटनेत सापडणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

काही राजकीय वरदहस्त असलेले कंपनीत जाऊन कंप्लिशन सर्टिफिकेट नाही. कंपनीचालकाने अनधिकृत शेड उभारले आहे, असे सांगत तक्रार दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळतात. अनधिकृत बंद टपऱ्यांमध्ये रात्री चोरीचा माल ठेवला जातो. चोरटेही लपण्यासाठी उपयोग करतात. रात्री थांबविण्यात येणाऱ्या बसचाही यासाठी उपयोग करतात.
- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

वारंवार गुन्ह्यात सापडणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते. भोसरी एमआयडीसीमध्ये चोरी आणि कामगारांना मारहाणीचे नऊ गुन्हे दाखल होते. या सर्व गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई झाली असून, सध्या ते तुरुंगात आहेत. गुन्ह्यावर आळा मिळविण्यासाठी एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग वाढविण्यात येईल.
- राजेंद्र निकाळजे, वरिष्ट पोलिस निरीक्षक, भोसरी एमआयडीसी.

सार्वजनिक वाहतुकीची वाणवा
एमआयडीसी परिसर साडेतीन हजार एकरात विस्तारलेला आहे. ७५ किलोमीटर रस्त्याचे जाळे पसरले आहे. मात्र, असे असतानाही भोसरी एमआयडीसी परिसरात अंतर्गत वाहतुकीची सोय नसल्याची खंत कामगारांनी व विशेषतः: महिला कामगारांनी व्यक्त केली. पीएमपीएमएलद्वारे एमआयडीसीतून मिनी बस सुरू केल्यास रात्र पाळीतही सुरक्षितपणे कंपनीवर पोचणे अथवा घरी पोचणे शक्य होणार असल्याने अंतर्गत मार्गावर कंपन्या सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस बस सुरू करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. अंतर्गत सार्वजनिक वाहतूक नसल्याने कामगारांना रात्री घरी जाताना लुटीचे प्रकारही अनेक घडतात.

पोलिस, लघुउद्योजकांचा स्तुत्य उपक्रम
दिवाळीच्या काळात काही दिवस एमआयडीतील कंपन्या बंद ठेवल्या जातात. या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत होते. हे टाळण्यासाठी लघुउद्योजकांनी पेट्रोलिंगसाठी पोलिसांना जीप दिली होती. पोलिसांनी या जीपसह आणखी तीन वाहनांद्वारे एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग केल्याने दिवाळीच्या सुट्टीत एकही चोरी झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com