‘अक्षय’ पाणीपुरवठा कधी होणार?
भोसरीतील अक्षयनगरमध्ये पंचवीस वर्षापासून पाणीटंचाई, टॅंकर मागवण्याची वेळ

‘अक्षय’ पाणीपुरवठा कधी होणार? भोसरीतील अक्षयनगरमध्ये पंचवीस वर्षापासून पाणीटंचाई, टॅंकर मागवण्याची वेळ

भोसरी, ता. १४ ः भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील अक्षयनगर हा शेवटचा भाग आहे. या परिसरात दुपारी बाराला पाणी सोडले जाते. मात्र, सुरवातीच्या भागातील नागरिक मोटार लावून पाणी खेचत असल्याने अक्षयनगरमध्ये पाणी तीन-चार तास उशिराने येते. त्यातही दाब कमी असल्याने पाणी भरता येत नसल्याने येथील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे टँकरने पाणी मागवावे लागण्याची वेळ आली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून ही समस्या सुटली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमधील अक्षयनगरातील आदर्श कॉलनी क्रमांक एक ते चार हा भाग मोशी-चऱ्होली प्रभाग क्रमांक चारला जोडला आहे. चक्रपाणी वसाहतीचा मोठा भाग धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत-सद्गुरुनगर प्रभाग सहाने व्यापला आहे तर काही भाग प्रभाग गवळीनगर-सॅंडविक कॉलनी प्रभाग पाचने व्यापला आहे. प्रभाग पाच आणि सहा चक्रपाणी वसाहतीला जोडून आहेत. मात्र, प्रभाग चार हा मोशी आणि चऱ्होलीचा भाग हा चक्रपाणी वसाहतीपासून सुमारे पाच किलोमीटरवर आहे.
अक्षयनगरमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने येथे पाइप लाइन टाकण्याचे काम केले. तरीही या भागातील सुमारे पन्नास घरांना पाणी कमी दाबाने आणि पाणी बंद होण्याच्या वेळेत पोचत असल्याची तक्रार येथील नागरिक शोभा सोनवणे, जयश्री सावंत, अनिल शिवळे, पौर्णिमा शितोळे, आरती वाघमारे आदींनी केली.

अनधिकृत नळ जोडणी
चक्रपाणी वसाहत परिसराचा बराचसा भाग इमारतींसह चाळीवजा घरांनी व्यापला आहे. त्याचप्रमाणे येथे भाडेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे बऱ्याच भागात घरमालकांनी अनधिकृत नळजोड घेतल्याचे पहायला मिळत आहे. हे अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी महापालिकेद्वारे मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. अनधिकृत नळजोड अधिकृत न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे महापालिकेने इशारा दिला आहे.

नागरिकांद्वारे पाण्याचा अपव्यय
पाणी सुटल्यानंतर नागरिकांद्वारे पाणी भरून झाल्यावर घरातील वाहने आणि घरासमोरील परिसर धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. विशेष म्हणजे पाणी बंद होईपर्यंत हा प्रकार सुरू राहत असल्याने चक्रपाणी वसाहतीच्या शेवटच्या भागात पाणी पोचत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेने केला आहे.

कोट
‘‘पाच पंचवार्षिक निवडणूक होऊनही अक्षयनगरमधील पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. पाणी ही मूलभूत गरज असतानाही येथील नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. महापालिकेने येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-शशिकांत देसाई, नागरिक, अक्षयनगर

‘‘अक्षयनगर परिसरात पाणी दुपारी बाराला येते. मात्र, अक्षयनगरातील आदर्श कॉलनी क्रमांक एक ते चारच्या शेवटच्या भागात पाणी चार-साडेचारच्या सुमारास कमी दाबाने येते. त्यामुळे पुरेसे पाणी भरता येत नाही. पाण्याअभावी घरकाम करणे तारेवरची कसरत झाली आहे. काही वेळेस पाण्याचा टॅंकरही मागवावा लागतो.
-सुनंदा शिंदे, नागरिक, अक्षयनगर.
----------------
चक्रपाणी वसाहतीमध्ये बहुतांश इमारतींना भूमिगत पाणी साठविण्याच्या टाक्या नाहीत. त्यामुळे नागरिक पाणी सुटल्यावर पाण्याच्या मोटारीचा उपयोग करून पाणी वरच्या मजल्यापर्यंत पोचवितात. पाणी बंद होईपर्यंत नागरिकांद्वारे मोटारी बंद केल्या जात नसल्याने चक्रपाणी वसाहतीच्या शेवटच्या भागात पाणी पोचत नाही. पाण्याची मोटार लावून पाण्याचा उपसा करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
-रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com