भोसरीला नाटकांचीही वैभवशाली परंपरा

भोसरीला नाटकांचीही वैभवशाली परंपरा

भोसरी, ता. ६ ः भोसरीला कबड्डी, कुस्तीप्रमाणेच कलेचीही परंपरा आहे. नव्वद वर्षांपूर्वी भोसरीत नाट्यकलाकार मंडळींनी नाट्य मंडळे स्थापन करत अनेक नाटकांचे प्रयोग पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातही केले. यामध्ये, गावातील पैलवान मंडळींचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. आजही काही नाट्यमंडळी ही परंपरा जपत जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा देत आहेत.
भोसरीत विकास तरुण नाट्य मंडळाची स्थापना गुरुवर्य नारायणराव तिखे यांनी १९५४ मध्ये केली. या नाट्य मंडळाद्वारे ‘बेबंदशाही’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘कवी अनंत फंदी’, ‘होनाजी बाळा’, ‘दसरा उजाडला’, ‘लग्नाची बेडी’, ‘संत तुकाराम’, ‘बिनबियांचे झाड’ आदी गाजलेल्या नाटकांसह ‘तेथे पाहिजे जातीचे’, ‘तोफेच्या तोंडी’, ‘दिवा जळू सारी रात’, ‘नवा संसार’, ‘पतीचा खून’, ‘अर्थाचा अनर्थ’, ‘सोन्याचा संसार’, ‘महाराष्ट्राचा शिलेदार’ अशा दर्जेदार व्यावसायिक नाटकांचे प्रयोग पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात केले.
भोसरीत ज्ञानोबा धोंडिबा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली १९६४ मध्ये हनुमान तरुण नाट्य मंडळाची स्थापना झाली. या नाट्य मंडळाद्वारे ‘ऐका हो ऐका’, ‘फकीरा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फिर्यादी’, ‘कसं काय पाटील’, ‘मल्हारी मार्तंड’ (उमाजी नाईक) आदी व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगाद्वारे भोसरीची नाटक परंपरा समृद्ध केली. याच सुमारास दत्तात्रेय बाळाजी लांडगे आणि त्रिंबक गोडांबे यांनी शिवशक्ती तरुण नाट्य मंडळाची स्थापना केली. या नाट्य मंडळाद्वारे ‘आग्र्याहून सुटका’, ‘माझी ठमी’ आदी व्यावसायिक नाटके रंगमंचावर आली. पुढे शिवशक्ती नाट्य मंडळाच्या शाखेचे ज्ञानोबा धोंडिबा लांडगे याच्या प्रयत्नाने हनुमान तरुण नाट्यमंडळात विलीनीकरण झाले. यासह मधले फुगे तालीम मंडळाद्वारे ‘करीन ते पूर्व’ हे नाटक बसविण्यात आले होते.
भोसरीतील डोळस वस्तीतील हौशी कलाकारांची कला जोपासण्यासाठी १९६५ मध्ये नाट्य रंगभूमीची निर्मिती केली. या रंगभूमीद्वारे ‘रंगलो रंभेच्या रंग महाली’, ‘सात पिढ्यांचा वैरी अर्थात खंडोबाची आण’, ‘चाळांचा नाद’, ‘ब्राह्मणाचा नवा जन्म’ आदी नाटके रंगमंचावर आली. या पिढीनंतर हा कलेचा वारसा जपत समता रंगभूमीची स्थापना झाली. या रंगभूमीच्या माध्यमातून ‘संकेत’, ‘सासरा मागतो आसरा’ आदी व्यावसायिक नाटके करण्यात आली.
भोसरीगावात नकला आणि सोगं या कलांनाही चांगला मान मिळाला. विठोबा दगडू गव्हाणे हे नकला आणि सोंगे करण्यात तरबेज होते.

पैलवानच नाट्यकलाकार
भोसरीतील पहिलवानांनी नाट्यक्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करत भोसरीचा नावलौकीक वाढविला. भोसरीतील फुगे, माने, लांडे, लांडगे, धावडे, गव्हाणे, शिंदे, कंद, डोळस, ओव्हाळ, गोडांबे, गोडसे, तिखे, लोंढे, टकले, रसाळ आदी कुटुंबातील कलाकार नाट्यक्षेत्रात होते. कबड्डी आणि कुस्तींसह नाट्यक्षेत्राची तेवढ्याच प्रमाणात तरुणांना आवड होती.

माझे वडील दिवंगत सदाशिवराव रामभाऊ फुगे हे विकास तरुण नाट्यमंडळाचे प्रमुख व्यवस्थापक होते. त्या काळात नाट्य मंडळाद्वारे मिळविलेला निधी गावच्या विकासासाठी वापरला जात होता. या निधीतून गावात रस्ते, पाणी, वीज आदी सुविधा सुरू करण्यास हातभार लागला.
- राजाराम महाराज फुगे, ज्येष्ठ नागरिक, भोसरी

माझे आजोबा दिवंगत विठोबा लांडे हे विकास तरुण नाट्य मंडळात कलाकार म्हणून काम करायचे. त्यांच्या ‘अनंत फंदी’ या नाटकाचे प्रयोग पुण्यातील बालगंधर्वमध्ये झालेले आहेत.
- विराज लांडे, सामाजिक कार्यकर्ते, भोसरी

गोविंद अमृता डोळस यांचा तमाशा फड होता. माझे वडील तुळशीराम सोपान डोळस यांचे व्याही दादोबा डोणेकर यांचा तमाशा फड डबघाईला आल्यानंतर त्यांनी ४० कलाकारांसह या तमाशा फडाचा आठ महिने सांभाळ केला. तसेच तमाशा मंडळाला उर्जित अवस्था दिली. ते उत्तम एकतारी भजन करत. आजही त्यावेळेची वाद्ये माझ्याकडे आहेत.
- महेंद्र डोळस, ढोलकीपटू, भोसरी.

माझे वडील नाटकात हार्मोनियम वादक होते. ढोलकीची साथसंगत करत होते. नाटकाचे दिग्दर्शनही ते करत होते. ‘ब्राह्मणाचा नवा जन्म’ या गाजलेल्या नाटकाचे ते लेखक होते.

- प्रकाश डोळस, संस्थापक अध्यक्ष, स्वरांजली कला, क्रीडा, मंच

BHS24B01698 BHS24B01697

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com