

भोसरी, ता. २३ : इंद्रायणीनगरात रस्ते तसेच पदपथांवर झाडांच्या फांद्या पडत आहेत. चार चाकी वाहनांवर झाड आणि फांद्या पडून नुकसानही झाले आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी आहे.
इंद्रायणीगरातील पेठ क्रमांक एकमधील स्वामी समर्थ केंद्र ते श्री तिरुपती बालाजी रस्त्यावर पाच ठिकाणी, पेठ क्रमांक दोनमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रवेशद्वार ते मिनी मार्केटपर्यंतच्या रस्त्यावर इमारत क्रमांक ६, ४२, ४६, ४८, ५४, ६१ इमारतींजवळील रस्ता येथे ही समस्या तीव्र आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते श्री हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर इमारत क्रमांक १७, २५, ३२, ३३, ५० आदि इमारतींजवळील पदपथ आणि रस्त्यावर झाडांच्या वाळलेल्या मोठमोठ्या फांद्या पडत आहेत. त्याचप्रमाणे भोसरीतील लांडेवाडीतील बीएसएनएल कंपनीजवळील बस थांब्यालगतही झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. वैष्णोमाता शाळा ते चैतन्य पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठमोठी झाडे आहेत. त्यांची छाटणी करण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र कॉलनीतील प्लॉट क्रमांक ३१७ व ३३२ जवळ धोकादायक झाडे आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाकडे दोन वर्षांपासून तक्रार करत असतानाही उद्यान विभाद्वारे केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिक कल्याण रोडे, शहाजी चव्हाण, किशोर मारुडवार, प्रसाद पिंगळे या नागरिकांनी केली आहे.
पाऊस जोरात आल्यावर वाहन चालक आणि पादचारी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडांच्या आडोशाला थांबतात. वादळ-वारे आल्यास पडणाऱ्या फांद्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असे ज्येष्ठ नागरिक रामदास जाधव यांनी सांगितले.
२०२२ मध्ये झाला होता दोघांचा मृत्यू
ऑगस्ट २०२२ मध्ये पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी पोलिस ठाण्याजवळ अंगावर झाड पडून दुचाकीवरील दोघाजणांना प्राण गमवावे लागले होते. त्याचप्रमाणे २०२२ मध्येच या मार्गावर एका शाळेच्या बसवरही झाड कोसळले होते. मात्र, सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
दहा दिवसांपूर्वी माझ्या चारचाकीवर झाड पडले. रस्ता आणि पदपथावर लहान मुले खेळत असतात. सुदैवाने गाडीने झाड अडल्यामुळे ते खाली पडले नाही. उद्यान विभागाला कळवले मात्र ते लवकर न आल्याने स्वतःहून क्रेन मागवून झाड बाजूला केले. अद्यापही तिलक रेसिडेन्सीसमोर धोकादायक झाड आहे. महापालिकेला कळवूनही कारवाई होत नाही.
- गणेश कोकणे, रहिवासी, इंद्रायणीनगर.
तीन आठवड्यापूर्वी कारवर झाडाची फांदी पडून नुकसान झाले. वाहनाच्या दुरुस्तीसाठी ५६ हजार रुपयांचा खर्च आला. वाहनांची दुरुस्ती करता येईल, मात्र झाड पडून एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास काय करावे, असा प्रश्न आहे.
- कल्याण रोडे, रहिवासी, इंद्रायणीनगर.
माझ्या इमारत क्रमांक ५०च्या पाठीमागे मोकळ्या जागेत लहान मुले खेळतात. याच ठिकाणी सुकलेल्या झाडांची गुरुवारी (ता. २२) फांद्या पडल्या. सुदैवाने तेथे मुले खेळत नव्हती.
- राजेंद्र पिंगळे, स्थानिक नागरिक, इंद्रायणीनगर.
पुणे-नाशिक महामार्गावरील महामार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे भोसरी आणि इंद्रायणीनगर परिसरातील झाडांचीही पाहणी झाली आहे. ३१ मेपर्यंत धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यात येतील.
- उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, उद्यान विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.