स्वच्छतेचा ‘दी एंड’; कचऱ्याचा ‘ट्रेंड’
संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. २४ ः दुर्गंधीचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन भोसरीतील आळंदी रस्त्यावरील कचरा संकलन केंद्र बंद पाडल्यामुळे भोसरी, दिघी, मोशी, चऱ्होली आणि बोपखेल परिसरातील घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही भागांत घंटागाड्या उशीराने तर; काही भागांत तीन ते चार दिवसांनी जात आहेत. त्यामुळे नागरिक उघड्यावर कचरा फेकत आहेत; तर काही जणांना कचरा घरात जास्त दिवस साठवून ठेवणे भाग पडत आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
भोसरीतील आळंदी रस्त्यावर फुगे वस्तीजवळील मोकळ्या जागेत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत भोसरी, दिघी, मोशी, चऱ्होली आणि बोपखेल परिसरातील कचरा संकलित केला जात होता. मात्र, कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने दोन महिन्यांपूर्वी परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांद्वारे हे कचरा संकलन केंद्र बंद पाडण्यात आले. त्यामुळे, सध्या घंटागाडीतील कचऱ्याचे संकलन कॉम्पेक्टर वाहनांद्वारे करण्यात येत आहे.
काय आहे कारण ?
कॉम्पेक्टर वाहन चऱ्होलीतील अलंकापुरमजवळील एका रस्त्यावर थांबत आहे. त्यामध्ये कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कचरा जमा करण्यास उशीर होत असल्याने घंटागाड्यांच्या फेऱ्यांवरही परिणाम होत आहे. पूर्वी प्रत्येक प्रभागात सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत एका घंटागाडीच्या चार फेऱ्या होत होत्या. मात्र, सध्या या फेऱ्यांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. काही भागांत घंटागाडी अगोदरच काठोकाठ भरून येत असल्याने कचरा न घेताच ती पुढे जाते. त्यानंतर कचरा घेण्यासाठी येत नाही.
घरात कचऱ्याची दुर्गंधी
भोसरीतील दिघी रस्त्यावरील आदर्शनगर, गवळीनगर परिसरात कधी दोन दिवसांनी; तर कधी चार दिवसांनी घंटागाडी येत आहे. त्यामुळे, घरात साचणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचा संताप शशिकला ओव्हाळ, रुपाली कांबळे, मधुमती काटकर, वंदना डोळस, उमा डोंगरे, सुलोचना सोनकुळे, संगीता डोळस, अप्सरा शेख, शुभांगी मालगणे, विद्या ओव्हाळ, वैशाली कातुर्डे, स्वाती देशमुख, आरती जठार आदी महिलांनी व्यक्त केला.
घंटागाडीचे नियोजन
ठिकाण प्रभाग क्रमांक घंटागाड्यांची संख्या
मोशी-चऱ्होली ३ १४
दिघी-बोपखेल ४ १०
गवळीनगर-सॅंडविक कॉलनी (भोसरी) ५ ७
भोसरी गावठाण-खंडोबामाळ (भोसरी) ७ ८
एकूण ३९
आमच्याकडे चार दिवसांनी घंटागाडी आली. त्यामुळे कचऱ्यात आळ्या झाल्या. आदर्शनगरात येणारी घंटागाडी अगोदरच काठोकाठ भरून येत असल्याने घंटागाडी कचरा न घेताच पुढे जाते. त्यानंतर कचरा घेण्यासाठी येत नाही.
- चित्रलेखा ओव्हाळ-डोळस, गृहिणी, आदर्शनगर, भोसरी
घंटागाडी नियमित येत नसल्याने काही नागरिकांद्वारे कचरा उघड्यावर फेकला जात आहे. तर काहीजण घराच्या बाहेर कचरा ठेवतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. महापालिकेने परिसरात घंटागाडी नियमित वेळेत पाठविणे गरजेचे आहे.
- रेखा ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या, भोसरी.
आळंदी रस्त्यावरील कचरा संकलन केंद्र बंद झाल्याने कॉम्पेक्टरमध्ये कचरा संकलित करण्यास अधिक वेळ लागत आहे. त्याने परिसरातील घंटागाड्यांच्या फेऱ्यांमध्ये फरक पडत आहे. त्यामुळे काही परिसरात घंटागाड्या विलंबाने पोहोचत आहेत.
- विकास शिरोळे, आरोग्य निरीक्षक, ई क्षेत्रीय कार्यालय
पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे कचरा संकलनासाठी आळंदी रस्त्यावरील कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानाच्या आतील एक एकरची जागा निश्चित केली आहे. लवकरच तेथून कचरा संकलित केला जाणार आहे. त्यानंतर घंटागाड्यांच्या अनियमित वेळेपासून नागरिकांची सुटका होईल.
- राजेश आगळे, ई क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
PNE25V34040
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.