अतिक्रमण निर्मूलन पथक, पथारी विक्रेत्यांत ‘लपाछपी’

अतिक्रमण निर्मूलन पथक, पथारी विक्रेत्यांत ‘लपाछपी’

Published on

भोसरी, ता. ५ ः वाढत्या अतिक्रमणांमुळे भोसरीतील आळंदी रस्त्यापाठोपाठ दिघी रस्त्यालाही वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असून ते लवकर सुटता सुटेनासे झाले आहे. दिघी रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक आल्यानंतर विक्रेते आपल्याकडील वस्तू सुरक्षित स्थळी नेतात. मात्र, हे पथक पुढे गेल्यावर विक्रेते लगेच रस्त्यावर येतात. त्यामुळे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वाहन पुढे आणि अतिक्रमण पाठीमागे असे चित्र दिघी रस्त्यावर नेहमीच पाहायला मिळत आहे.
भोसरीतील दिघी रस्ता हा भोसरीवरून दिघीला जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यातच या रस्त्यावर सॅंडविक कॉलनी, आदर्शनगर, छत्रपती संभाजीनगर, संत तुकारामनगर, गवळीनगर, गंगोत्री पार्क आदी भागांतील नागरिक या रस्त्याचा ये-जा करण्यासाठी उपयोग करतात. याच रस्त्यावर हातगाडी, पथारी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. विशेषतः संध्याकाळच्यावेळेस रस्त्याच्या कडेला टेम्पो चालक, हातगाडीवाले, पथारीवाले हे भाजी, फळे आदींसह विविध वस्तू विकण्यासाठी बसलेले असतात. त्यातच ग्राहक रस्त्याच्याकडेला दुचाकी, चारचाकी वाहने लावत असल्याने रस्ता आणखी अरुंद होत आहे. पदपथाअभावी ग्राहकही मुख्य रस्त्यानेच ये-जा करत असल्याने संध्याकाळच्यावेळेस या रस्त्यावर वाहनांची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.

कारवाईचा फार्स
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून दिघी रस्त्यावर कारवाई केली जाते. मात्र, अतिक्रमण निर्मलून विभागाचे वाहन आल्याचे कळताच विक्रेत्यांद्वारे हातगाडी, टेम्पो, विक्रीचे साहित्य जवळील गल्लीत नेले लपविले जाते. अतिक्रमण निर्मूलन वाहन पुढे गेल्यावर विक्रेते लगेच रस्त्यावर येतात. त्यामुळे अतिक्रमण वाहन पुढे आणि अतिक्रमण पाठीमागे असे चित्र दिघी रस्त्यावर नेहमीच पाहायला मिळते.

गंगोत्री पार्कजवळील ताण
दिघी रस्त्याचा गंगोत्री पार्कमधून जाणारा भाग अरुंद आहे. त्यातच या भागातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने ऐन पावसाळ्यात सुरू केले आहे. या रस्त्यावरील बसील पार्क सोसायटी जवळील रस्ता अगदीच अरुंद असल्याने एका बाजूची वाहने थांबवून दुसऱ्या बाजूची वाहने पुढे जातात. त्यामुळे गंगोत्री पार्कजवळील रस्त्यावरही वाहनांची कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. या भागातही होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण दिघी रस्त्यावर पडतो. आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास वाहन चालक दिघी रस्त्याने पुढे जाणे पसंत करतात. त्याचप्रमाणे आळंदी रस्त्यावरून वाहने कै. सखुबाई गवळी उद्यान आणि कृष्ण मंदिर रस्त्याने दिघी रस्त्याला येतात. त्यामुळेही दिघी रस्त्यावर वाहतूक कोंडीत भर पडलेली दिसून येते.


भोसरीतील आळंदी रस्त्यावरून दिघीला जाण्यासाठी सुमारे साडेतीन किलोमीटरच्या दूरच्या अंतराने जावे लागते. त्यातच आळंदी रस्त्यावरही वाहतूक कोंडी नित्याचीच पाहायला मिळते. त्या मानाने भोसरीतील दिघी रस्ता जवळचा असल्याने या रस्त्याचा उपयोग करतो. मात्र, संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यावरही वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो.
- सोमनाथ शिंदे, वाहन चालक

दिघी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण दिसून येते. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी होते. आता महापालिका दिघी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणार आहे. हे काम नियोजनबद्धपणे न केल्यास दिघी रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग


काय करायला हवे ?
- अतिक्रमण केलेल्या विविध विक्रेत्यांवर कारवाई करणे
- वाहतुकीसाठी संपूर्ण रस्ता उपलब्ध राहील, यासाठी प्रयत्न करणे
- रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांचे पुनर्वसन करणे
- रस्त्याच्याकडेला दिवस-रात्र नियमित पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे
- अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संध्याकाळच्या वेळेस फेऱ्या वाढविणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com