इंदूर पॅटर्न, स्वच्छ भारत अभियानाचाच ‘कचरा’

इंदूर पॅटर्न, स्वच्छ भारत अभियानाचाच ‘कचरा’

Published on

भोसरी, ता. १६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार आणि पाचमधील कचरा संकलनासाठी जागाच नाही. त्यामुळे रस्त्याच्याकडेला कॉम्पेक्टर वाहन थांबवून कचरा संकलित करण्याची वेळ महापालिकेच्या आरोग्य विभागावर आली आहे. काही भागांत दोन-दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने नागरिक मोकळ्या जागेवर कचरा फेकत असल्याने महापालिकेच्या इंदूर पॅटर्न आणि स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे पूर्वी भोसरीतील धावडे वस्तीजवळील गावजत्रा मैदानात घंटागाड्यांद्वारे कचरा संकलित करण्यात येत होता. नागरिकांच्या विरोधानंतर हे कचरा संकलन केंद्र भोसरीतील आळंदी रस्त्यावरील कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानाच्या मोकळ्या जागेत हलविण्यात आले. या ठिकाणीही व्यावसायिक आणि नागरिकांच्या विरोधानंतर हे संकलन केंद्र तीन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले. त्यानंतर चऱ्होलीतील अलंकापुरीजवळील रस्त्यावर कॉम्पेक्टर वाहन थांबवून तेथे कचरा संकलित करण्यात येत होता. या ठिकाणीही विकासकाकडून विरोध झाल्याने सध्या कॉम्पेक्टर वाहन वडमुखवाडीतील आळंदी-पुणे पालखी मार्गाच्या सेवा रस्त्यावर थांबवून कचरा संकलित करण्यात येत आहे. त्यामुळे ‘कचरा संकलनासाठी कोणी जागा देता का ?’ अशी म्हणण्याची वेळ महापालिकेच्या आरोग्य विभागावर आली आहे.
घरोघरी कचरा साचून राहत असल्याने घंटागाडी दररोज पाठविण्याची मागणी भोसरीतील आदर्शनगर-गवळीनगमधील राधेश्याम वर्मा, अजय शर्मा, तुषार भुजबळ, विशाल डोळस, पंकज ओव्हाळ, शैलेंद्र पवार, दिलीप ओव्हाळ, शैलेश कांबळे, राजेंद्र खांडेभराड, विजय कांबळे, संजय कांबळे, डॉ. मेघनाथ निंबाळकर, अमित ढमाळ, मुकेश कातुर्डे, मिलिंद कदम आदी नागरिकांनी केली आहे.

काय आहे समस्या ?
- कॉम्पॅक्टर वाहनात कचरा टाकण्यासाठी घंटागाड्याच्या लांबच लांब रांगा
- कचरा संकलनाठी वेळ अधिक, घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी
- भोसरीतील आदर्शनगर, गवळीनगर, नूर मोहल्ला, संत तुकारामनगर; तर दिघीतील साई पार्क, दत्तनगर, संत ज्ञानेश्वर सोसायटी आदींसह इतर भागांत दोन-दोन दिवसांनी घंटागाडी
- कचरा साचून राहिल्याने घरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- मोकळी जागा आणि रस्त्याच्याकडेला कचरा टाकण्याचे प्रकार


कचरा संकलन केंद्रावर अतिक्रमण
भोसरीतील आळंदी रस्त्यावरील कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानातील मोकळ्या जागेत कचरा संकलन केला जात होता. कचरा संकलन केंद्र बंद पाडल्यानंतर येथील मोकळ्या जागेचा काही नागरिकांनी अनधिकृतपणे ताबा मिळविला आहे. त्याचप्रमाणे येथे तारेचे कुंपणही टाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

दिघी परिसरात दोन-दोन दिवसांनी येत असलेल्या घंटागाडीमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. कचरा साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने कचरा संकलन केंद्र सुरू करून ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.
- संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, दिघी

घंटागाडी दोन - दोन दिवसांनी असल्याने घरात साचलेल्या कचऱ्यांमध्ये माशा आणि रोगजंतू होत आहेत. त्याचप्रमाणे दुर्गंधीही सुटते. घंटागाडी आल्यानंतर एकतर ती अगोदरच काठोकाठ भरून येते. त्याचप्रमाणे घंटा गाडीवरील गाणे हळू आवाजात लागत असल्याने घंटागाडी आल्याचे कळेपर्यंत ती पुढे निघून गेलेली असते.
- राहुल ओव्हाळ, स्थानिक नागरिक, आदर्शनगर, भोसरी

कचरा संकलनासाठी भोसरीतील आळंदी रस्त्यावरील कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानात जागा मिळाली आहे. तेथे महापालिकेच्या पर्यावरण विभागाद्वारे बांधकाम करून ती हस्तांतरीत करण्यात येणार आहे. कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी परिसरात घंटागाड्यांची संख्या वाढविण्यात येईल.
- तानाजी नरळे, ई क्षेत्रीय अधिकारी, महापालिका

कचरा स्थानांतरणासाठी महापालिकेद्वारे एक एकरची जागा मिळाली आहे. या जागेवर लवकरच कचरा संकलनासाठी योग्य त्या बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

Marathi News Esakal
www.esakal.com