भोसरीतील अतिक्रमणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

भोसरीतील अतिक्रमणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

Published on

भोसरी, ता. ११ ः भोसरीतील जवळपास सर्वच रस्ते आणि पदपथांवर विक्रेत्यांचे अतिक्रमण झालेले दिसत आहे. पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. मात्र, महापालिकेद्वारे अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई होत नाही. त्यामुळे, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
भोसरीतील विविध रस्त्यांच्या पदपथांवर पथारी, स्टॉल, विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यातच काही विक्रेत्यांनी रस्त्यांवरही अतिक्रमण केल्याने चालावे कुठून ? हा प्रश्न पादचाऱ्यांना पडला आहे. दिघी रस्त्यावर फळे आणि भाजी विक्रेते संध्याकाळच्या वेळेस रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून हातगाडी, टेम्पो लावतात. त्याचप्रमाणे पथारीवाल्यांचीही भर येथे मोठ्या प्रमाणात पडली आहे. आळंदी रस्त्यावर पदपथांवर येथील दुकानदारांनी विविध विक्रीच्या वस्तू ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर कपडे आणि विविध वस्तू विक्रेत्यांनी हातगाडी लावून अतिक्रमण केले आहे.


कुठे आहेत अतिक्रमणे ?
- पुणे-नाशिक महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील सेवा रस्ता
- चांदणी चौक ते धावडे वस्तीपर्यंतच्या रस्ता
- लांडेवाडी चौक ते चांदणी चौकापर्यंतचा रस्ता


पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह
पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्ता आणि पदपथावरील अतिक्रमण केलेल्या विविध वस्तू, फळे विक्रेत्यांचे पुनर्वसन केले. विक्रेत्यांना उड्डाणपुलाखालची जागा बळकावली. त्यातच काही फळे विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्याच्याकडेला हातगाडी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे, महापालिकेने उड्डाणपुलाखालील केलेल्या पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोजच वाहतूक कोंडी
भोसरीतील आळंदी आणि दिघी रस्ते मुळातच अरुंद आहेत. त्यातच या रस्त्याच्याकडेला विविध वस्तू विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण आणि खरेदीस येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने लावतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी होते. त्याने दररोज संध्याकाळच्या वेळेस वाहन चालक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

दुकानांच्या कमानी रस्त्यावर
दसरा, दिवाळी सणांमध्ये भोसरील पुणे नाशिक महामार्ग सेवा रस्ता, दिघी रस्ता आणि आळंदी रस्त्यावर काही सोने-चांदी विक्रेत्यांद्वारे पदपथ आणि रस्त्यांवर कमानी उभारुन जाहिरात केली जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना जाण्यासाठी जागा उरत नाही. चांदणी चौकाकडून लांडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका सोने-चांदी विक्रेत्याने रस्त्यावरच बॅरिकेड्‍स लावून रस्ता वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी बंद केला आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणारे विद्यार्थी, महिला, कामगार यांना मुख्य रस्त्याने चालावे लागत आहे.

काय करायला हवे?
- रस्ते आणि पदपथावरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करणे
- हॉकर्स व नो हॉकर्स झोन तयार करणे
- रस्त्यावर सम-विषम पार्किगचे नियोजन करणे
- नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणे
- रस्त्यावर अतिक्रमणे होऊ नये यासाठी उपाययोजना करणे
- फिरत्या पथकांद्वारे कारवाई, रात्रीच्यावेळेस देखील गस्त

भोसरीतील जवळपास सर्वच रस्ते आणि पदपथांवर विक्रेत्यांचे अतिक्रमण झालेले दिसत आहे. महापालिकेद्वारे अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई होत नाही. त्यामुळे, अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. अतिक्रमणांमुळे मुख्य रस्त्याने चालावे लागत असल्याने वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची भीती वाटते.
- समाधान मानमोडे, ज्येष्ठ नागरिक, भोसरी

संध्याकाळचे वेळेस आळंदी रस्ता आणि दिघी रस्ता या दोन्ही रस्त्यांवर वाहनांची कोंडी झालेली असते. त्यामुळे दिघी, आळंदीकडे संध्याकाळच्या वेळेस या रस्त्याने जाताना मनस्ताप सहन करावा लागतो. ही समस्या महापालिकेने दूर करणे गरजेचे आहे.
- रामेश्वर निलंगारे, वाहन चालक

भोसरीतील विविध रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. अतिक्रमण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- तानाजी नरळे, इ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Marathi News Esakal
www.esakal.com