प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘यशा’ला गवसणी
भोसरी, ता. २३ ः घरची परिस्थिती तशी बेताचीच...जीवनात काही तरी करून दाखविण्याची जिद्द...मैदानात अभ्यासाला सुरूवात...मात्र ऊन, वारा, पावसाचा त्रास...मदतीला धावून आलेले भोसरीतील विक्रमशीला प्रबोधिनी बुद्धविहार...आणि दिवसरात्र अभ्यासाने यशाला घातलेली गवसणी...ही सत्यकथा आहे ग्राम महसूल अधिकारी झालेले यश राजेश गायकवाड यांची !
यश गायकवाड हे वडगाव शेरीत राहतात. मात्र, मोशीतील शिक्षक संतोष बोरुडे यांचे मार्गदर्शनासाठी ते भोसरीत आले. त्यांनी बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघीतील मॅगझीन चौकाजवळील मोझे विद्यालयाच्या मोकळ्या जागेत अभ्यासाला सुरूवात केली. मात्र, तेथे कधी ऊन, कधी वारा; तर कधी पावसाचा त्रास त्यांना सहन करावा लागला. भाड्याचे घर घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे यश यांनी भोसरी परिसरात अभ्यासासाठी विनामोबदला जागा मिळते का ? याचा शोध सुरू केला. एके रविवारी दिघीतील कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानासमोरील विक्रमशीला प्रबोधिनी बुद्धविहारात बुद्ध वंदनेचा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी बुद्धविहार गाठले. अभ्यासासाठी येणारी अडचण सांगून जागा मिळेल का ? अशी विचारणा त्यांनी बुद्धविहाराच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा, पदाधिकाऱ्यांनी त्याला संमती दिली.
वडगावला अधिकारीपदी रुजू
यश यांनी नित्यनियमाने अभ्यासाला सुरुवात केली. हे पाहून बुद्ध विहाराच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बुद्धविहार अभ्यासासाठी चोवीस तास उपलब्ध करुन दिले. त्यानंतर यश यांनी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अविरतपणे सुरू केला. २०२३ मध्ये शासनाच्या ग्राम महसूल अधिकारी पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी २०० पैकी १८६.९८ गुण मिळवून यश संपादन केले. त्यांना या पदासाठी ११ सप्टेंबरला वडगाव मावळसाठी ग्राम महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र मिळाले. त्यांनी १२ सप्टेंबरला या पदाचा पदभार स्विकारला.
मला स्पर्धा परीक्षेद्वारे प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा होती. त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. मला स्पर्धा परीक्षेच्यामाध्यमातून मनासारखे पद मिळाले आहे. भोसरीतील विक्रमशीला प्रबोधिनी बुद्धविहाराचे पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे या पदाला मी गवसणी घालू शकलो.
- यश गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी, वडगाव मावळ
संस्काराबरोबर ज्ञानदान
बुद्धविहारातून संस्काराबरोबरच ज्ञानदानाचेही कार्य व्हावे हा उद्देश आहे. सध्या काही विद्यार्थी बुद्धविहारात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. त्यांना अभ्यासासाठी सुविधा पुरविण्याचे काम बुद्धविहाराद्वारे केले जात आहे. बुद्धविहारात संतोष बोरुडे हे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यश गायकवाड यांच्या यशाने आनंद झाला असल्याचे
विक्रमशीला बुद्धविहार पदाधिकाऱ्यांनी सांगितले.