मृत आईच्या नेत्रदानामधून दोन दिव्यांगांना दृष्टी

मृत आईच्या नेत्रदानामधून दोन दिव्यांगांना दृष्टी

Published on

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा

भोसरी, ता. २५ : अनेक गैरसमज असल्याने मृत नातेवाईकाचे अवयवदान करण्यास त्याचे कुटुंब तयार होत नाही. मात्र, शाहूनगरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश उत्तम कसबे यांनी त्यांच्या आई इंदुबाई उत्तम कसबे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करत दोन दिव्यांगांना दृष्टी दिली आहे. इतकेच नव्हे; तर कसबे यांनी समाजात नेत्रदानाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून मोहीम राबविण्याचाही निर्णय घेतला आहे.
इंदुबाई कसबे (वय ८४) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात इंदुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणल्यानंतर व्हीफोर ऑर्गन्स फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी सुरेश कसबे यांना नेत्रदानाविषयी विचारणा केली. तेव्हा, कसबे यांनी सामाजिक विचार करत नेत्रदान करण्याची तत्परतेने तयारी दर्शविली. तसेच इंदुबाई यांच्या नेत्रांचे दान करून दोन दिव्यांगांना दृष्टी देण्याचा डोळस निर्णय घेतला.
मृत्यूनंतरही जग पाहायचे असेल; तर नेत्रदान करा, असे म्हटले जाते. मात्र, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यात अनेक गैरसमजुती असल्याने कुटुंबीय तयार होत नाहीत. तो दूर करुन अधिकाधिक नेत्रदान करण्यासाठी जून महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने व्ही फोर ऑर्गन्स फाउंडेशनने कामाला सुरुवात केली. कुटुंबांचे समुपदेशन करत त्यांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत संबंधित कुटुंबाने संमती दिल्यावर त्यांच्या मृत नातेवाईकाचे नेत्रदान करून घेतले जात आहे.


नेत्रदानास सहा तास
एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या व्यक्तीचे नेत्रदान सहा तासांच्या आत करणे गरजेचे असते. सहा तास उलटल्यानंतर नेत्रदान करता येत नाही. मृत कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यासाठीही वेळ जातो. त्याचप्रमाणे समाजामध्ये अवयव दानाविषयी विविध अंधश्रद्धा आणि गैरसमजुती आहेत. या कारणांमुळे नेत्रदान होण्यास अडचणी येतात.

नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. मृत्यूनंतरही जग पाहण्याची संधी मृत व्यक्तीला मिळते. त्यामुळे आईच्या मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांमध्ये नेत्रदान करण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून मोहीम राबवणार आहे. शाहूनगरातील धम्मचक्र बुद्ध विहारातून या मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे.
- सुरेश कसबे, सामाजिक कार्यकर्ते

नेत्रदानाविषयी कुटुंबांचे समुपदेशन झाल्यानंतर फक्त दहा टक्के कुटुंबे नेत्रदानासाठी तयार होतात. अंधांची संख्या प्रचंड असल्याने होणारे नेत्रदान अत्यल्प आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अवयवदानाबद्दल समाजामध्ये असणारा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी संस्था दिवस-रात्र काम करत आहे.
- श्रीकांत आपटे, संस्थापक-अध्यक्ष, व्ही फोर ऑर्गन्स फाउंडेशन

Marathi News Esakal
www.esakal.com