भोसरीतील उड्डाणपुलाखालील जागेत ‘ओपन बार’

भोसरीतील उड्डाणपुलाखालील जागेत ‘ओपन बार’

Published on

भोसरी, ता. २७ ः राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली राडारोडा आणि अनधिकृत अतिक्रमणे झाली असून अर्बन सिटीअंतर्गत सुरू केलेले सुशोभीकरणाचे कामही रेंगाळले आहे. पुलाच्या स्तंभांचे जाहिराती लावल्याने विद्रुपीकरण झाले आहे. काही व्यावसायिकांनी पार्किंगसाठी जागा काबीज केली आहे. जवळच देशी आणि वाईन शॉप असल्याने पुलाखालील जागेत तळीरामांचा ‘ओपन बार’ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
भोसरीतील पुणे - नाशिक महामार्गावर शीतलबाग ते धावडे वस्तीपर्यंत राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाचा विस्तार आहे. राजमाता जिजाऊ उड्डाणपूल भोसरीच्या मध्यातून जातो. या उड्डाणपुलाच्या स्तंभांवर कोणी जाहिरात चिकटवू नये यासाठी महापालिकेने स्तंभावर आकर्षक सजावट करत रंगरंगोटी केली होती. मात्र, महापालिकेचा हा अंदाज चुकवत फुकट्या जाहिरातदारांकडून स्तंभांवर विविध प्रकारच्या जाहिराती चिकटविल्या जात आहेत. या जाहिराती काढताना स्तंभांवरील रंगही निघून गेला आहे. काही स्तंभ पाण्याच्या ओघळाने काळे पडले आहेत. या स्तंभांखालील भागाचे अर्बन सिटीअंतर्गत सुरू केलेले सुशोभीकरणाचे काम संविधान चौक ते एचडीएफसी बॅंकेपर्यंत रेंगाळले आहे.
भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलजवळील भागांत तळीरामांचा तळ असतो. तेथे जवळच देशी आणि वाईन शॉप असल्याने उड्डाणपुलाखालील जागेत तळीरामांचा ‘ओपन बार’ सुरू असतो. अशीच परिस्थिती संविधान चौकाजवळही रात्रीच्यावेळेस पाहायला मिळते.


काय आहेत समस्या ?
- मोकळ्या जागेत राडारोडा, भंगारातील वाहने पडून
- काही जणांकडून पार्किंगसाठी जागेवर कब्जा
- फळविक्रेत्यांकडून निरुपयोगी वस्तूंची साठवणूक
- स्तंभांवरील जाहिरातींमुळे विद्रूपीकरण, मात्र कारवाई नाही
- पुलाखालील अतिक्रमणांकडेही महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष
- पावसाच्यावेळेस उड्डाणपुलावरुन तीन ठिकाणी पाण्याची मोठी गळती

वाहनचालकांचा अपघात
उड्डाणपुलावर पावसाळी पाणी वाहण्यासाठी बसविलेल्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर चांदणी चौक ते पीएमटी चौक दरम्यान तीन ठिकाणी धबधब्यासारखे पाणी उड्डाणपुलावरून रस्त्यावर पडते. पाऊस थांबल्यानंतरही हा धबधबा काही काळ सुरूच असतो. हा धबधबा चुकविताना काही वाहन चालक घसरून पडल्याचेही काही नागरिक सांगतात. विशेष म्हणजे अशी परिस्थिती काही वर्षांपासून असतानाही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.


काय करायला हवे ?
- तळीरामांचा बंदोबस्त करणे, अतिक्रमणे हटविणे
- फुकट्या जाहिरातदारांचा शोध लावून दंड वसूल करणे
- उड्डाणपुलावरून स्तंभांवर पडणारे पावसाचे पाणी थांबविणे
- अर्बन सिटीचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करणे
- अनधिकृतपणे जागा बळकाविणाऱ्यांवर कारवाई करणे
- उड्डाणपुलाखाली राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे



भोसरीतील अर्बन सिटीच्या कामाची पाहणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे काम सुरू करण्यासाठी महापालिकेद्वारे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळ विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका


उड्डाणपुलाखाली बीआरटीएस टर्मिनलजवळ आणि पीएमटी चौकाजवळील स्तंभांजवळ काही तळीराम आणि नागरिक लघुशंका करत असतात. त्या दुर्गंधीमुळे येथून जाताना नाकावर हात ठेवून जावे लागते.
- सुनील देसाई, प्रवासी

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली काही व्यावसायिकांनी पार्किंगसाठी जागेवर अवैध कब्जा केला आहे. इतर नागरिकांना त्यांची वाहने त्या ठिकाणी लावू दिली जात नाहीत. त्यामुळे महापालिकेने उड्डाणपुलाखाली वाहनांच्या पार्किंगच्या केलेल्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- एक स्थानिक नागरिक, भोसरी


भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील स्तंभांवर जाहिरात चिकटविणाऱ्या जाहिरातदारांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे त्यानंतरही त्यांच्या जाहिराती स्तंभांवर दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. उड्डाणपुलाखालील भागांत राडाराडा टाकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
- तानाजी नरळे, ‘इ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका


BHS25B03260
भोसरी : येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे उड्डाणपूल खालील भागाचे डम्पिंग ग्राउंड झाले आहे.

BHS25B03261
भोसरी: स्तंभावर चिटकवण्यात आलेल्या जाहिरातीमुळे झालेले विद्रूपीकरण.

BHS25B03262
भोसरी: स्तंभावरून पावसाचे पाणी वाहिल्याने काळे पडलेले स्तंभ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com