अतिक्रमणांकडे दुर्लक्षाने प्रमुख रस्त्यांवर कोंडीचा कहर
भोसरी, ता. ९ : भोसरीतील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेस होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भोसरीकरांची समस्या वाढली आहे. रस्त्याच्याकडेच्या अनधिकृत विक्रेत्यांच्या अतिक्रमणांकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षाने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. या समस्येतून भोसरीकरांची सुटका कधी होईल ? असा संतप्त सवाल वाहनचालक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
भोसरीतील पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाणपूल बांधण्यात आला. तरीही सेवा रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस होणाऱ्या वाहतूक कोंडीतून भोसरीकरांची सुटका झालेली नाही.
वाहनांचा अडथळा
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या सुरूवातीला शीतलबाग येथील सारस्वत बॅंकेजवळील रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहने लावलेली असतात. अशीच परिस्थिती चांदणी चौकाजवळील रस्त्यावरही दिसते. दिघी रस्ता आणि आळंदी रस्त्यांवरही दोन्ही बाजूला वाहने लावली जातात. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस पुणे - नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर खासगी प्रवासी वाहने थांबलेली असतात. भोसरीतील पीएमपीएमएलच्या बीआरटीएस टर्मिनलजवळ रिक्षा अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या असतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीत भर पडते.
विक्रेत्यांचे अतिक्रमण
भोसरीतील दिघी रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस भाजी-फळे विक्रेत्यांचे अतिक्रमण झालेले असते. आळंदी रस्त्यावर कपड्यांसह विविध वस्तू विक्रेत्यांचे अतिक्रमण असते. त्याचप्रमाणे सेवा रस्त्यावरही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. खरेदीसाठी येणारे ग्राहकही रस्त्यावरच वाहने लावतात. त्यामुळे, रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो.
वाहतूक पोलिसांचा अभाव
भोसरीतील संविधान चौक, चांदणी चौक येथे वाहतूक पोलिस आणि वॉर्डन पाहायला मिळतात. मात्र, दिघी रस्ता, आळंदी रस्ता, पीएमपीएमएलच्या सद्गुरु डेपो चौक आदी भागांत वाहतूक पोलिसांचा अभाव दिसतो. त्यामुळे या भागांत होणाऱ्या कोंडीचा परिणाम इतर रस्त्यांवरही झाल्याचे दिसतो.
वाहतूक कोंडीमुळे अडचणी
- वाहन चालकांचा वेळ वाया जातो
- इंधनही जास्त लागत असल्याने आर्थिक नुकसान
- रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून रुग्णांच्या जीविताला धोका
- वाहतूक कोंडीचा पादचाऱ्यांसह इतर नागरिकांनाही त्रास
- कोंडीत अधिक काळ वाहने सुरू राहिल्याने वायू प्रदूषणात वाढ
भोसरी वाहतूक विभागाकडे वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. अधिक वाहतूक कोंडीच्या रस्त्यावर वाहतूक पोलिस आणि वॉर्डनची नियुक्ती करण्यात येईल. रस्त्यावर थांबत असलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात येईल.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग
भोसरीतील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या भाजी-फळे आदी विविध वस्तू विक्रेत्यांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यांवर विक्रेत्यांचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी कडक कारवाईही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेवर थांबणाऱ्या हातगाड्या आणि टेम्पो यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
- तानाजी नरळे, ‘इ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील रस्त्यांसह दिघी रस्ता आणि आळंदी रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस नेहमीच वाहतूक कोंडी झालेली असते. त्यामुळे भोसरीतून प्रवास करणे रोजचीच डोकेदुखी होत आहे.
- कैलास शिंदे, वाहन चालक
गंगोत्री पार्ककडे जाण्यासाठी आम्हाला दिघी रस्त्याचाच एकमेव
पर्याय आहे. मात्र, या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी झालेली असते. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे संविधान चौकाजवळ दिघी रस्त्यावर काम चालू असल्याने आळंदी रस्त्याचा उपयोग करावा, असा फलक लावणेही गरजेचे आहे.
- प्रेमनाथ गोपाळे, स्थानिक नागरिक, गंगोत्री पार्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

