रस्त्यावरील चेंबरचा वाहनचालकांना धसका

रस्त्यावरील चेंबरचा वाहनचालकांना धसका

Published on

भोसरी, ता. २ ः भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी आणि वडमुखवाडी परिसरातील रस्त्यांवरील पावसाळी व सांडपाणी वाहिनींच्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी चेंबरजवळील सिमेंट पूर्णपणे निघून गेले आहे, तर काही ठिकाणी चेंबर खचलेले तसेच रस्त्याच्या पातळीपेक्षा उंचावलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दररोज कसरत करत प्रवास करावा लागत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. परिणामी, या परिसरातील चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
लांडेवाडीतल्या ऐतिहासिक प्रवेशद्वाराजवळ, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ, लांडेवाडीतील महाराष्ट्र बँकेसमोरील रस्ता, दिघी रस्त्यावर प्रियदर्शनी शाळेजवळील चौक, गंगोत्री पार्कसमोरील सिल्व्हर लीफ सोसायटीजवळ, संभाजीनगरातील चौक, शांतिनगर कॉलनी क्रमांक एक समोरील रस्ता, दिघीतील साईपार्कहून माऊलीनगरकडे जाणारा मार्ग, दिघीगावातील माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेसमोरील रस्ता, सह्याद्री क्रीडा मंडळासमोरील रस्ता, इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक २ मधील इमारत क्रमांक ४१ समोरील पदपथ, पेठ क्रमांक १ मधील ओमनगरी रस्ता, तसेच वडमुखवाडीतील मोझे शाळेसमोरील भुयाराजवळ अशा अनेक ठिकाणी चेंबर नादुरुस्त अवस्थेत आहेत.

सिमेंट रस्त्यांवरही चेंबरचे खड्डे कायम
महापालिकेकडून भोसरीतील प्रभाग क्रमांक ७ तसेच प्रभाग ५ मधील कै. सखूबाई गवळी उद्यानाजवळून आळंदी रस्ता-दिघी रस्त्याला जोडणाऱ्या मार्गांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यांवरील पावसाळी व गटाराच्या चेंबरची कामे निकृष्ट दर्जात झाल्यामुळे काही ठिकाणी चेंबर खचले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दिघी रस्त्याच्याही सिमेंट कॉंक्रिटचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, या रस्त्यावरील चेंबरचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावर चेंबरचे खाचखळगे पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दिघीतील धोकादायक चेंबर
दिघीतील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सीमाभिंतीजवळील शिवनगरी कॉलनी क्रमांक एकजवळ पावसाळी वाहिनीचे चेंबर अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्यावर कोणतेही विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी हे चेंबर दिसत नाही आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो. तसेच भारतमातानगर-गायरानातून आळंदीला जोडणाऱ्या मार्गावरील गटाराचे चेंबर गेल्या सहा महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असून त्यातून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत आहे. या समस्येकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

वाहनचालक त्रस्त; पाठदुखीची तक्रार
नादुरुस्त चेंबरवरून जाताना वाहने आदळून त्यांचे नुकसान होत आहे. तसेच, या धक्क्यांमुळे वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास वाढल्याची तक्रार काही वाहनचालकांनी सांगितली.

‘‘किरकोळ देखभाल दुरुस्तीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे निविदा प्रसिद्ध केली आहे. लवकरच निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. इंद्रायणीनगर आणि परिसरातील रस्त्यावरील नादुरुस्त चेंबरच्या दुरुस्तीसह इतरही नागरी सुविधेची कामे करण्यात येईल.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता, ‘क’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय

‘‘भोसरी, दिघी परिसरातील रस्त्यांवरील गटार आणि पावसाळी चेंबरची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर ते दुरुस्तही करण्यात येतील. लवकरच या कामाला सुरुवात होईल.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता, ‘ई’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय

‘‘इंद्रायणीनगरातील ओमनगरी रस्त्याच्या डांबरीकरणानंतर चेंबर खाली गेले आहे. चेंबरजवळ खोल खड्डे पडले असून, वाहने या खड्ड्यांत अडकून पडतात. त्यामुळे हे चेंबरचे खड्डे धोकादायक झाले आहेत. तातडीने दुरुस्ती केली पाहिजे.
- राहुल ताकवले, वाहनचालक

‘‘लांडेवाडीतील विकास कॉलनीजवळील रस्त्यावरील चेंबरच्या झाकणाचे सिमेंट निखळून खड्डे पडत आहेत. हे वारंवार घडत असतानाही महापालिककेद्वारे यावर ठोस उपाययोजना केली जात नाही.
- सुदाम तांबे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com