दिघी रस्त्याला वाहतूक कोंडीचे ‘ग्रहण’

दिघी रस्त्याला वाहतूक कोंडीचे ‘ग्रहण’

Published on

भोसरी, ता. ३ ः भोसरीतील दिघी रस्त्यावर नित्याचीच वाहतूक कोंडी होत असतानाही भोसरी वाहतूक पोलिस विभागाद्वारे संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यावरील मुख्य चौकात वाहतूक पोलिस अथवा वार्डनची नियुक्ती अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. वाहतूक कोंडी झाल्यावर वाहतूक पोलिस या कोंडीतून मार्ग काढत चौकात जाऊन वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे महापालिकेद्वारे या रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दिघी, भोसरीकरांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महापालिकद्वारे दिघी रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येत आहे. सध्या गंगोत्री पार्क ते आदर्श शाळेपर्यंतच्या निम्म्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गंगोत्री पार्क ते आदर्श शाळेपर्यंतचा अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे गंगोत्री पार्क, दिघीकडे जाणाऱ्या वाहनांमुळे या अर्ध्या रस्त्यावर कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. दिघी रस्त्यावरील प्रियदर्शनी शाळेजवळील चौक आणि सिद्धेश्वर शाळेजवळील चौकात संध्याकाळच्या वेळेस काही वाहने अस्ताव्यस्तपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहनांच्या कोंडीत भर पडते.
भोसरीतील दिघी रस्ता हा भोसरीवरून दिघीला जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यातच या रस्त्यावर सॅंडविक कॉलनी, आदर्शनगर, छत्रपती संभाजीनगर, संत तुकारामनगर, गवळीनगर, गंगोत्री पार्क आदी भागातील नागरिक या रस्त्याचा ये-जा करण्यासाठी उपयोग करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असलेले पाहायला मिळते.
संध्याकाळच्या वेळेस या रस्त्याच्या कडेला टेंपोचालक, हातगाडीवाले, पथारीवाले भाजी, फळे आदींसह विविध वस्तू विकण्यासाठी बसलेले असतात. त्यातच ग्राहक रस्त्याच्या कडेला दुचाकी, चारचाकी वाहने लावत असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. पदपथाअभावी ग्राहकही मुख्य रस्त्यानेच ये-जा करत असल्याने संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यावर वाहनांची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.
या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली असतानाही भोसरी वाहतूक पोलिसांद्वारे येथील मुख्य चौकात वाहतूक पोलिस अथवा वार्डनची नियुक्ती केलेली दिसत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यावर पोलिसांची या रस्त्यावर पळापळ सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

अर्ध्या किलोमीटरसाठी अर्धा तास
संविधान चौक ते गंगोत्री पार्क हे अंतर सुमारे अर्धा किलोमीटरचे आहे. वाहतूक कोंडीमुळे हे अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागत असल्याने रोजच वाहतूक कोंडीचा सामना करत वेळ आणि पैसा वाया जात असल्याने या रस्ता परिसरात राहणाऱ्या नागरिकांची समस्या वाढली आहे.

रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका
संध्याकाळच्या वेळेस रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकत असल्याने मार्ग काढण्यासाठी रुग्णवाहिका चालकाला दमछाक करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

वाहतूक पोलिसांचे नेहमीचे कारण
भोसरी वाहतूक पोलिस विभागाकडे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या रस्त्यावरील चौकात वाहतूक पोलिस अथवा वार्डनची नियुक्ती करण्यात येत नसल्याचे भोसरी पोलिस वाहतूक शाखेद्वारे नेहमीच सांगण्यात येते. त्यामुळे वाहन चालक आणि भोसरीकर हतबल झाले आहेत.

महापालिकेचेही दुर्लक्ष
या रस्त्याच्या कडेला संध्याकाळच्या वेळेस अनधिकृत विक्रेत्यांद्वारे हातगाडी, टेंपो लावण्यात येत असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच ग्राहकही रस्त्याच्या कडेला वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. असे असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण भरारी पथकाद्वारे रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने वाहन
चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

संध्याकाळच्या वेळेस भोसरीतील दिघी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असते. मात्र, पर्याय नसल्याने या रस्त्याने जावे लागते. त्यामुळे रोजच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
- चंद्रकांत गायशिंगाडे, स्थानिक नागरिक, दिघी रस्ता, भोसरी

सध्या मतदार याद्यावरील सूचना आणि हरकतींवर सुनावणीचे काम चालणार आहे. यानंतर दिघी रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
- तानाजी नरळे, ई प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, महापालिका

भोसरीतील दिघी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर वाहतूक कोंडी नाहीशी करण्यासाठी योग्य ते कारवाई करण्यात येईल. भोसरी वाहतूक पोलिस विभागाकडे स्टाफ कमी असल्याने दिघी रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी इतर भागातील वाहतूक पोलिसांना पाचारण करावे लागते.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com