मतदारांची दिवाळीनंतरही ‘दिवाळी’
भोसरी, ता. ११ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजू लागल्यावर इच्छुकांद्वारे मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून सुरू आहे. निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार असल्याने आचारसंहितेपूर्वी मतदारांना विविध भेटवस्तू देणग्ंयासह देवदर्शन यात्रेबरोबरच मतदारांच्या फायद्याचे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने मतदारांची दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी होत आहे.
महापालिकेच्या निवडणूक होणार असल्याने निवडणूक आयोगाद्वारे मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. या कामाची महापालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांची लगीनघाई सुरू आहे. यातच इच्छुक उमेदवारांद्वारांद्वारेही मतदारांपर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. २०२२ ते २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना निवडणुकीने हुलकावणी दिली होती. मात्र, निवडणूक होणार या आशेने २०२२ ते २०२४ पर्यंतही इच्छुक उमेदवारंनी विविध कार्यक्रम घेत मतदारांशी संपर्क साधला होता. या कालावधीत काही उमेदवारांनी मतदारांना दिवाळीच्या शिध्यासह भेटवस्तू वाटल्या होत्या. मात्र, निवडणूक पुढे गेल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला होता आणि केलेला खर्चही वाया गेला. त्यामुळे २०२५ मध्ये निवडणूक होणार की नाही यासाठी कार्यक्रम घेताना इच्छुक उमेदवारांद्वारे सावध पवित्रा घेण्यात येत होता. मात्र, निवडणूक आयोगाने यावर्षी निवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने इच्छुक उमेदवारांद्वारे पुन्हा कार्यक्रम घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच आपल्या प्रभागातील मतदारांना आपलेसे करण्यासाठी शहर परिसरातील इच्छुक उमेदवारांनी महिला मतदारांनी साडी भेट, मोफत देवदर्शन यात्रा, आरोग्य तपासणी आदींसह विविध कार्यक्रम घेत मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच विविध भेटवस्तू मिळत असल्याने मतदारांची दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी साजरी होत आहे.
नागरी सुविधेसाठी पळापळ
काही माजी नगरसेवक प्रभागात जातीने लक्ष देताना दिसत आहेत. कोठे चेंबर तुंबले, कुठे कचरा साचला, कुठे रस्ता खचला आदींसह नागरी असुविधेकडे लक्ष देत महापालिकेच्या माध्यमातून ती कामे पूर्ण करून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर एखादी समस्या टाकल्यावर माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार तेथे धाव घेताना दिसत आहेत. पूर्वी नागरिक समस्या घेऊन ती सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या संपर्क कार्यालयात जात होते. तेथे नागरी समस्या सोडविण्यासाठी नागरिकाद्वारे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येत होती. आता मतदार संपर्क कार्यालयात न जाता उमेदवाराला वैयक्तिक समस्येचे फोटो पाठवत आहेत.
मतदाराच्या मनात काय?
निवडणुकीत कोणत्या भागातील मतदार आपल्या बाजूने असतील याचा कल जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांद्वारे परिसरात संपर्क वाढवला जात आहे. कार्यकर्त्यांची फळीही तयार करण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवाराद्वारे होताना दिसत आहे. विविध माध्यमातून ‘मतदारांच्या मनात काय?’ याचाही शोध घेण्याचा प्रयत्न इच्छुकाद्वारे होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

