तमीळ बहीण-भावांची तब्बल १३ वर्षांनी हृदयस्पर्शी भेट
संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. ८ ः डोक्याला मार लागून काहीसे भ्रमिष्ट झालेल्या तमिळनाडूतील आंबेतालगा गावामधील वर्धराजन अलगू यांची आणि त्यांच्या बहिणीची तब्बल १३ वर्षांनंतर भेट झाली. एकमेकांना पाहून दोघांनाही अश्रू अनावर झाले. बहीण-भावाचा जिव्हाळा आणि आपुलकी पाहून सर्वांची मने हेलावली.
तमिळनाडूतील आंबेतालगा गावातील वर्धराजन अलगू यांनी तेरा वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड शहर गाठले. मराठी-हिंदी येत नसल्याने त्यांची अडचण झाली. येथे भटकंती करत त्यांनी गुजराण केली. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते आजारी पडले. त्यांना हालचालही करता येत नव्हती. चिंचवड पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी वर्धराजन यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल केले. परंतु त्यांना त्यांचा पत्ता सांगता येत नव्हता. हे लक्षात आल्यावर महापालिकेचे समाजसेवा अधीक्षक महादेव बोत्रे, कुंडलीक आंमले यांनी रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे संचालक एम. ए. हुसैन यांच्यामार्फत त्यांची रवानगी महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात केली. निवारा केंद्राद्वारे त्यांची सेवासुश्रूषा होत होती. या केंद्राला भेट देणारे वेल अकमुगम यांनी वर्धराजन यांच्याशी तमीळ भाषेत संवाद साधत त्यांच्या गावचा पत्ता मिळविला. त्यांनी निवारा केंद्राच्या सहकार्याने समाजमाध्यमाद्वारे तामिळनाडूतील त्यांच्या कुटुंबाशी शुक्रवारी (ता. ६) संपर्क साधला. तेव्हा काही तासांतच मोशी येथे राहणारी त्यांची बहीण रमादेवी देवेंद्रन निवारा केंद्रात दाखल झाली.
आईला भेटायचंय...
वर्धराजन यांच्या आईचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. बहीण रमादेवीकडे वर्धराजन यांनी आईला भेटायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा, रमादेवींना काय सांगावे कळत नव्हते. मात्र, गावाला गेल्यावर आईची भेट होईल, असे सांगून त्यांनी वर्धराजन यांची समजूत घातली.
१३ वर्षांपूर्वी वर्धराजन यांनी तामिळनाडू सोडले होते. तेव्हा, नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र तो वाया गेला. कोरोना काळानंतरही वर्धराजनचा शोध लागत नसल्याने त्यांचे काहीतरी बरेवाईट झाल्याचे समजून घरच्यांनी वर्धराजनचा शोध घेणे थांबविले होते.
- सुरेश देवेंद्रन, मेव्हणा
तेरा वर्षानंतर भावाला बघून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. सावली निवारा केंद्रामुळे मला माझा भाऊ मिळाला. माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. भाऊ मिळाल्याने त्यांच्या मुलासह गावातील नातेवाईक पिंपरी चिंचवडला येत आहेत.
- रमादेवी देवेंद्रन, बहीण, मोशी
सावली निवारा केंद्राद्वारे निराधारांना आधार देण्याबरोबरच त्यांच्या उपचारासाठीही पाठपुरावा केला जातो. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन घरीही पोचविले जाते. या कामी ‘वायसीएम’ रुग्णालय प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, महापालिकेच्या समाजसेवा विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळत असते.
- एम. ए. हुसेन, संचालक, रिअल लाइफ रिअल पीपल संस्था, पिंपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

