संत ज्ञानेश्वर सृष्टीत श्रद्धा आणि पर्यटनाचा संगम
भोसरी, ता. १० ः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे शिल्प, आकर्षक लॅंडस्केपिंग, संतांची माहिती देणारी म्युरल्स, अॅम्फी थिएटर, आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे वडमुखवाडीतील संत ज्ञानेश्वर सृष्टी भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने वडमुखवाडीतील पुणे-आळंदी पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारली आहे. संत ज्ञानेश्वर सृष्टीमध्ये ब्राँझ धातूमधील संतांची माहिती देणारी एकूण ४७ म्युरल्स उभारली आहेत. या मुरल्सजवळ प्रसंगांची माहिती देणारे फलकही उभारले आहेत.
जीवनचरित्रावर मूरल्स...
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी चालविलेली भिंत, ज्ञानेश्वरी लेखन, निवृत्तीनाथांना उपदेश करताना गहिनीनाथ, ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजणे, मुंगी उडाली आकाशी, नामयाची खीर, नामदेव पायरी-पंढरपूर, विठू माझा लेकुरवाळा, दार उघड बया, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भेट, चांगदेव महाराज गर्वहरण, संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी प्रसंग आदी प्रसंगासह महाराष्ट्रातील संतांची माहितीही म्युरल्सद्वारे साकारण्यात आली आहे.
भव्य वारकरी पताका
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे शिल्प उभारण्यात आले आहे. एकूण २५ शिल्पांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराजांसह संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज आणि संत मुक्ताबाई यांच्यासह वारकऱ्यांच्या शिल्पांचा समावेश आहे. याखेरीज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज समूह शिल्पाजवळ २०० फूट उंचीची वारकरी पताका (झेंडा) उभारण्यात आली आहे.
आकर्षक लॅंडस्केपिंग
संत ज्ञानेश्वर सृष्टीत आकर्षक लॅंडस्केपिंग करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध आकर्षक शोभेची झाडेही लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथे अबालवृद्ध विरंगुळ्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे नव वधू-वर येथे फोटो शूट करण्यासही पसंती देत आहे. या ठिकाणी भव्य ॲम्फी थिएटरही उभारण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर सृष्टीत राज्यातील जवळपास सर्व संतांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांना संत ज्ञानेश्वर सृष्टीत आणल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील थोर संत आणि आपल्या वारकरी परंपरेबद्दल माहिती मिळते.
- भूषण कदम, पर्यटक
संत ज्ञानेश्वर सृष्टीमध्ये ऑक्सिजन देणारी देशी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आहेत. तसेच वारकरी संप्रदायाची माहिती देणारे काही पूरक प्रकल्पही येथे राबविण्यात येतील.
- महेश गारगोटे, उपायुक्त, उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

