वीजपुरवठ्याचा अनियमित फेरा; महावितरणचा तोरा
चिंचवड, ता. २६ ः गेल्या आठवडाभरापासून चिंचवडमधील इंदिरानगर परिसरातील नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शुक्रवारी (ता.२६) पुन्हा एकदा उच्चदाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पाच ते सहा घरांतील टीव्ही, लॅपटॉप, वॉशिंग मशिन, एसी, मोटार पंप यासारखी महागडी उपकरणे जळाली.
इंदिरानगर भागात सकाळी नऊ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला असून अद्याप सायंकाळपर्यंत विजेचा मागमूस नव्हता. मागील आठवड्यात संतोषी माँ कॉम्प्लेक्सजवळ कंत्राटदाराकडून झालेले अर्धवट काम वीज पुरवठा बिघडण्याचे मुख्य कारण ठरत आहे. केवळ तात्पुरत्या सिंगल फेज जोडणीवर सर्व परिसर चालू होता. गेल्या आठवडाभरापासून वीजेचा दाब कमी-जास्त होत आहे. परंतु याकडे विद्युत वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आले आहेत.
‘होम प्रोटेक्टर लावा’
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी फोन उचलणे तर दूरच, तक्रारींवरही कोणी दाद देत नाही. काही ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधल्यावर ‘होम प्रोटेक्टर लावा’, असे थेट उत्तर देण्यात आले. आमच्या नुकसानीला जबाबदार कोण ? असा सवाल आता नागरिक करु लागले आहेत.
गेल्या सात दिवसांपासून माझ्या भागात अनियमित दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे आमची वॉशिंग मशीनची मोटर जळाली. आमचे खूप नुकसान झाले. महावितरण कंपनीने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा मोठे अपघात होतील.
- अमर गायकवाड, रहिवासी, इंदिरानगर
गेले कित्येक दिवसांपासून इंदिरानगरमध्ये वीज सारखी जात आहे. वीज पुरवठा अनियमित आहे. आमच्या घरातील पाण्याची मोटर जळाली आहे. आम्ही सर्वसामान्य माणसांनी काय करायचे ? महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- अमित चौधरी, रहिवासी, इंदिरानगर
इंदिरानगर भागात आमचे अधिकारी, कर्मचारी काम करत असून कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. केबल तपासणीसाठी वाहन पाठवले आहे. यापुढे काळजी घेतली जाईल. उच्चदाबामुळे घरगुती उपकरणामध्ये बिघाड झालेल्या नागरिकांनी स्वतंत्र अर्ज द्यावेत. त्यासंबंधी तपासणी करून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल.
- दिवाकर देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, बिजलीनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.