वाल्हेकरवाडीतील पुलाच्या दुरुस्ती कामात दिरंगाई
चिंचवड, ता.१२ ः सुमारे चार महिन्यांपूर्वी वाल्हेकरवाडीतील रेणुका हाउसिंग सोसायटीजवळील पूल पावसात खचून वाहून गेला आहे. हा रस्ता दळणवळणाचा असूनही दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याने नागरिकांकडून महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच या कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या झाल्या असून समन्वय अधिकाऱ्याचीही नियुक्ती प्रलंबित आहे.
मागील तीन महिन्यांत महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या तीन क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तर समन्वय अधिकाऱ्याचीही नेमणूक झालेली नाही. सोमवारी (ता.११) झालेल्या जनसंवाद सभेत केवळ पाच ते सहा तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये मुख्यत्वे वाल्हेकरवाडीमध्ये पावसाने खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, महावितरणकडून ‘शट डाऊन’ न मिळाल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. परंतु चार महिन्यांत तब्बल वीस गुरुवार गेले. तरीही महावितरणकडून ‘शट डाऊन’ घेऊन काम सुरू करता आले नाही. महापालिकेच्या स्थापत्य विभागाने याबाबत किती पाठपुरावा केला ? याची शंका नागरिक व्यक्त करत आहे.
पत्रव्यवहारावर भर
मागील तीन महिन्यांत तीन क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तर समन्वय अधिकाऱ्याचीही नेमणूक झालेली नाही. सभेत नागरिकांना एकत्र बसवून त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी बंद दाराआड एकेक करुन भेट घेण्याची पद्धत अजूनही सुरू असल्याने सभेचा उद्देशच मोडीत गेल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नवीन इमारतीतील प्रशस्त व स्वतंत्र हॉल उपलब्ध असूनही तिथे सभा घेण्याऐवजी फर्निचर नसल्याचे सांगत अधिकारी केवळ पत्रव्यवहारावर तोडगा काढत आहेत.
‘अ’ व ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मी स्वतः हजर राहून तक्रार नोंद केलेली आहे. परंतु दोन्ही ठिकाणी समन्वय अधिकारी नव्हते. रेणुका सोसायटी जवळील पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. हा महत्वाचा रस्ता आहे. पूल नसल्याने डी. वाय. पाटील महाविद्यालयासह अन्य शाळा महाविद्यालयांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी खूप मोठा वळसा घालून जावे लागत आहे. मात्र, अधिकाऱ्यांना लोकांना देणे घेणे नाही.
- मोहियुद्धिन शेख, स्थानिक नागरिक, वाल्हेकरवाडी
वाल्हेकरवाडी पुलासंदर्भात स्थापत्य विभागाशी बोलणे झाले आहे. महावितरणच्या दिरंगाईमुळे ते काम थांबले होते. सध्या स्थापत्य विभागाने नवीन सांडपाणी चेंबरचे काम देखील पूर्ण केले आहे. लवकरच या पुलाचे काम देखील पूर्ण होईल. जनसंवाद सभेसाठी हॉल देखील लवकरच नागरिकांना एकत्रित बसण्यासाठी तयार मिळेल.
- अश्विनी गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.