गणेशोत्सवातील देखाव्यांची भाविकांना भुरळ

गणेशोत्सवातील देखाव्यांची भाविकांना भुरळ

Published on

चिंचवड, ता. २ : परिसरातील विविध गणेश मंडळांनी यंदा सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक आशयाचे देखावे सादर केले आहेत. काही मंडळे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत; तर काहींनी इतिहास जागवून सामाजिक संदेश दिला आहे. भाविकही या सर्व देखाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

‘एसकेएफ’ गणेश उत्सव मंडळ
या मंडळाने या वर्षी ५५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘माझं स्वातंत्र्य माझा संसार’या जिवंत देखाव्यातून ‘हुंडाबळी’ या सामाजिक संकटावर भाष्य केले. आत्महत्या नव्हे; तर कायद्याच्या मदतीने लढा द्यावा हा प्रभावी संदेश मंडळाने दिला आहे. अध्यक्ष नाथा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम भाविकांचे लक्ष वेधतो आहे.

उत्कृष्ट तरुण मंडळ, भोई आळी
हे मंडळ यंदा ४४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाने या वर्षी ‘पुरंदरचा धुरंदर वीर मुरारबाजी’ हा ऐतिहासिक देखावा उभारला आहे. अध्यक्ष नागेश आगज्ञान यांच्या मार्गदर्शनाखाली सजविलेला हा देखावा देशभक्ती जागवणारा ठरतो आहे.

श्री मयुरेश्वर मित्र मंडळ, गणेश पेठ
मंडळाने ५५ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त ‘वटसिद्धनाथांचा जन्म’ हा हलता देखावा सादर केला आहे. अध्यक्ष प्रवीण यादव व उपाध्यक्ष माधव डबीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा उभारला असून, चिंचवडमध्ये रामनवमी उत्सवाची सुरुवात सर्वप्रथम याच मंडळाने केली होती.

आदर्श तरुण मंडळ, लोंढेनगर-तानाजीनगर
मंडळाने या वर्षी ‘नृसिंह अवतार’ हा पौराणिक देखावा उभारला आहे. मंडळाने या वर्षी ५४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अध्यक्ष कविश्वर चांदणे यांच्या प्रयत्नातून उभारलेला हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

नवतरुण मंडळ, भाजी मंडई
सुमारे ७२ वर्षांचा वारसा असलेल्या या मंडळाने यंदा ‘स्वराज्य समशेर ताराराणी-स्वराज्य रक्षक’’ हा ऐतिहासिक देखावा साकारला आहे. अध्यक्ष सागर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली सजविलेला हा देशभक्ती जागवणारा उपक्रम भाविकांना प्रेरणा देत आहे.

उत्कर्ष मित्र मंडळ, लिंक रोड
मंडळाने यंदा ५४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्त ‘अक्कलकोट स्वामींचा समाधी मठ व वटवृक्ष’ हा देखावा साकारला आहे. अध्यक्ष नकुल भोईर यांच्या नेतृत्वाखाली सजविलेला हा उपक्रम भाविकांना आकर्षित करतो आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ
मंडळाने या वर्षी श्री तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा उभारला आहे. अध्यक्ष शिवम डांगे यांच्या नेतृत्वाखाली साकारलेला हा उपक्रम तसेच गेल्या पाच वर्षांपासून नियमित महाप्रसादाचे आयोजन वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे. हे मंडळ या वर्षी ४० व्या वर्षात पदार्पण करत आहे.

अखिल मंडई मित्रमंडळ
यंदा ३६ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या या मंडळाने ‘कुंभकर्णाचा वध’ हा हलता पौराणिक देखावा साकारला आहे. अध्यक्ष अतुल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला हा देखावा नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ, गांधीपेठ ‘चिंचवडचा राजा’ म्हणून प्रसिद्ध हे मंडळ ६४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अध्यक्ष विठ्ठल सायकर व कार्याध्यक्ष महेश मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली ‘जागर गोमातेचा’ हा जिवंत देखावा साकारण्यात आला असून गोरक्षणाचा प्रभावी संदेश यातून दिला जात आहे.

गांधी पेठ तालीम मित्रमंडळ
मंडळाने ‘राजे तुम्ही असता तर’ हा समाजप्रबोधनपर देखावा उभारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून भाषा वाद, राजकारण व तरुणाईच्या समस्यांवर उपाय सुचविणारा हा उपक्रम अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्या नेतृत्वाखाली साकारला आहे. हे मंडळ या वर्षी ४४ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

समता मित्रमंडळ, काळभोरनगर
यावर्षी ४८ व्या वर्षात पदार्पण करत मंडळाने ‘ऑपरेशन सिंदूर’ हा देशभक्तीपर देखावा साकारला आहे. अध्यक्ष गोपी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसह हा उत्सव आगळावेगळा ठरला आहे.

समाधान तरुण मंडळ, चिंचवड स्टेशन
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हा जिवंत देखावा मंडळाने सादर केला आहे. अध्यक्ष अक्षय मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या उपक्रमातून मराठी भाषेचे संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. हे मंडळ या वर्षी ५८ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

श्रीराम सेवा ट्रस्ट, रामनगर
हे मंडळ यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या वर्षी गणेशेात्सवात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. अध्यक्ष अमर दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आलेला हा उपक्रम सर्वांना भावतो आहे.

श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ, बुरुंजाची तालीम
या मंडळाने ५९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने भव्य ११ फुटी स्वामींची मूर्ती सोहळ्यात उभारली आहे. अध्यक्ष मंगेश शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

नवप्रगती मित्रमंडळ, इंदिरानगर
यंदा २८ व्या वर्षात पदार्पण करत मंडळाने ‘वन विद्युत रोषणाई’ हा विशेष देखावा साकारला आहे. अध्यक्ष हर्षवर्धन भोईर यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला हा उपक्रम निसर्गसंवर्धनाचा संदेश देतो आहे.

श्री साईनाथ तरुण मंडळ, मोहननगर
सुवर्णमहोत्सवी वर्षात मंडळाने ‘शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका’ हा ऐतिहासिक देखावा साकारला आहे. अध्यक्ष गणेश लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला हा उपक्रम भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

राष्ट्रतेज तरुण मंडळ, काळभोरनगर
४२ व्या वर्षात पदार्पण करत मंडळाने ‘आपले किल्ले, आपला इतिहास, आपला अभिमान’ हा जिवंत देखावा साकारला आहे. अध्यक्ष नाना काळभोर व कार्याध्यक्ष योगेश बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यांचे संवर्धन व अभिमान जागवणारा संदेश दिला जात आहे.

यशस्वी मित्रमंडळ व प्रशांत शेट्टी प्रतिष्ठान
मंडळाने ४५ व्या वर्षात पदार्पण करत या वर्षी ‘शुभमंगल सावधान’ हा समाजप्रबोधनपर देखावा साकारला आहे. अध्यक्ष चेतन मोंडोकार, प्रसाद शंकर शेट्टी व विजय गोरख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साकारलेला हा उपक्रम संसारातील गैरसमज आणि सामाजिक मूल्यांवर भाष्य करतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com