चिंचवडेनगरची ममता राज्यात मुलींमध्ये द्वितीय स्थानी
चिंचवड, ता.१७ ः राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत चिंचवडेनगर येथील ममता शशिकांत औटे हिने संपूर्ण राज्यात मुलींत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पदांसाठी तिची निवड झाली आहे. शिक्षक वर्ग, मित्र परिवार तसेच नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक तसेच पोलिस उपनिरीक्षक पदांच्या एकूण ४७९ जागांसाठी आयोजित केलेल्या पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून तब्बल २ लाख ८६ हजार उमेदवारांनी अर्ज केला. २ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेतून ८१७९ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यानंतर २६ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत ममताने एकूण २९८ गुण मिळवत राज्यात मुलींत द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत यश मिळवणे सोपे नव्हते. मात्र जिद्द, चिकाटी, सातत्याने केलेला अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ममताने हे यश नोंदवले. औटे कुटुंबाचे मूळगाव आमनापूर (पलूस, जि. सांगली). सध्या ते चिंचवडेनगर येथे ३१ वर्षांपासून राहत आहेत. ममताचे वडील सीएनसी मशीन रिपेरिंग करण्याचे काम करतात.
‘‘माझे हे यश कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच शक्य झाले. विशेषत: माझे चुलते प्राचार्य डॉ. जगदीश औटे यांचे मार्गदर्शन मिळाले. आई-वडील आणि महत्वाचा आजीचा पाठिंबा, प्रोत्साहन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले. त्यामुळे मी हे माझे यश माझी आजी यशोदा औटे यांना समर्पित केले आहे. तसेच माझे ध्येय अजून ‘आयएएस’ होऊन लोकसेवा करण्याचे आहे.
- ममता औटे, यशस्वी स्पर्धा परीक्षार्थी
‘‘माझी एकुलती एक मुलगी मूळची हुशार आणि ध्येयवेडी आहे. आयटी कंपनीमध्ये नोकरी करुन पैसे कमवायचे, असा मुलांचा कल आहे. पण, माझ्या मुलीला राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मोठी अधिकारी व्हायचे आहे. लोकांची सेवा करायची आहे. त्यामुळे आम्ही देखील तिला पाठिंबा दिला. तिने ठरविल्याप्रमाणे तसे यश देखील तिला मिळत आहे."
- मीनाक्षी औटे, आई
‘‘मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे. सुरुवातीलाच १० वी मध्ये देखील तिने ९७ टक्के गुण मिळविले. आता तिने हे यश मिळवले. आतापर्यंत तिने २०० पुस्तके वाचली आहेत. आजीची शिक्षणाची प्रेरणा मिळालेली ममता ही एक चौथी नात आहे.’’
- शशिकांत औटे, वडील