पितृपक्षात रोटरी क्लबचे वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप

पितृपक्षात रोटरी क्लबचे वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप

Published on

चिंचवड, ता. १९ ः पितृपक्षातील अन्नदान हेच श्रेष्ठदान या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने आपुलकी वृद्धाश्रम तसेच स्वर्णनगरी वृद्धाश्रम येथे अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त आयोजित उपक्रमाला रोटरी सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आळंदीतील आपुलकी वृद्धाश्रमातील २५ ज्येष्ठांना १५ हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. बोराडे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली १५० ज्येष्ठांना पुन्हा घरी पाठवण्यात यश मिळाले आहे.
निगडी प्राधिकरणातील स्वर्णनगरी वृद्धाश्रमात १०० किलोहून अधिक कोरडा शिधा वितरित करण्यात आला. या कार्यासाठी कोल्हापूरातील मेघा शिर्के व साक्षी गानगीर यांनी प्रत्येकी १००० रुपये देणगी दिली. तसेच अश्विनी खोले यांच्या मैत्री महिला बचत गट आणि श्रेया चिंचवडे व कुटुंबीय आदींनी साहित्यरूपाने सहकार्य केले.
क्लबच्या वतीने दीपाली जाधव, माऊली ग्रुप, राजेंद्र आवटे, वैशाली पाटील, दीपा खैरनार, केतन अहिरराव या दात्यांचे आभार मानण्यात आले. वृद्धापकाळात अध्यात्माची साथ मिळाली तर तो सुखकर होतो. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, हीच खरी समाजसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष भरत चव्हाण, सचिव वसंत ढवळे, गोविंद जगदाळे, संदीप भालके, गणेश बोरा यांच्यासह अनेक सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com