परदेशातील मराठीजन घेणार घरच्या फराळाचा आस्वाद
चिंचवड, ता.२७ ः अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून परदेशात स्थायिक झालेल्या बांधवांनाही घरगुती फराळाची चव चाखता यावी, यासाठी पुणे टपाल विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘दिवाळी फराळ परदेशात’ या अभिनव उपक्रमांतर्गत माफक शुल्कात पॅकिंग करुन फराळ आणि इतर वस्तू अमेरिकावगळता जगभर पाठवता येणार आहे. या शिवाय नागरिकांना यंदा ‘फ्री पिकअप’ सेवाही दिली जाणार आहे.
मागील वर्षी या उपक्रमातून पुणेकरांनी तब्बल १८ हजार किलो फराळ आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचविला होता. यंदाही ही सेवा उपलब्ध असून लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या यासारख्या फराळाच्या पदार्थांसोबत भेटवस्तूही परदेशात पोहोचविता येणार आहेत. त्यासाठी मुख्य टपाल कार्यालयांत फराळ पॅकिंगसाठी आधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. काही मिनिटांत सुरक्षित पॅकिंग करून पार्सल थेट परदेशात पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पार्सल सेवेबरोबर ‘फ्री पिकअप’
दिवाळीचा फराळ तयार करून झाला; परंतु बऱ्याच जणांना तो पाठविण्याचा मुहूर्तच सापडत नाही. त्यामध्ये कधी-कधी दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून टपाल विभागात जायचे कधी ? हा प्रश्न पडतो. अशा सर्व नागरिकांसाठी घरी येऊन फराळाचे पार्सल घेऊन जाण्याची सुविधा टपाल विभागाने यावर्षी उपलब्ध केलेली आहे. त्यासाठी पोस्टमन दिवाळीचे फराळ घरी येऊन विनामूल्य घेऊन जातील. या सेवेसाठी टपाल विभागाचे विपणन अधिकारी संदीप बटवाल, मोबाईल क्र. ९९२१९०४१८९ आणि साई पाटील, मोबाईल क्र. ९६७३१६७१७८ यावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत संपर्क साधता येईल.
मी टपाल विभागाची सेवा याआधीही घेतलेली आहे. याआधी मुलाचे कपडे वगैरे पाठवलेले आहेत. बाकी सर्व कुरिअरच्या तुलनेत टपाल विभागाचा वजनानुसार कमी खर्च येतो. बाहेर हेच खर्च जास्त सांगतात. माझा मुलगा एमबीबीएस करण्यासाठी रशियामध्ये आहे. त्यासाठी मी या अगोदर कपडे तसेच काही महत्त्वाची पुस्तके पाठवलेली आहेत. पोस्टाची पॅकिंगची सुविधा देखील चांगल्या प्रतीची आहे आणि यावर्षी दिवाळी फराळ देखील पाठवत आहे.
- रोहन भेके, ग्राहक
यावर्षी टपाल विभागाने पार्सल बरोबर ‘फ्री पिकअप’ ची सुविधा देखील दिलेली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड तसेच इतरही ठिकाणच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परदेशात असणाऱ्या भारतीय आणि मराठी कुटुंबियांना दिवाळी फराळ पाठवण्यासाठी सर्वांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि आपल्या प्रियजनांच्या दिवाळीच्या आनंदात भर टाकावी.
- अभिजीत बनसोडे, डाक निदेशक, पुणे क्षेत्र
CWD25A02131
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.