चिंचवडगाव तलाठी कार्यालयासमोर कचरा आणि राडारोडा
चिंचवड, ता.१० ः चिंचवड गावातील ग्राम महसूल कार्यालयाच्या समोर कचऱ्याचा ढीग आणि राडारोडा अस्ताव्यस्त पडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात ये-जा करताना अडचण येत आहे.
चिंचवड आणि आकुर्डी ग्राम महसूल तलाठी कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, कार्यालयासमोरील परिसरात लोखंडी फ्रेम, लाकडाचे बांबू, पाइप, प्लॅस्टिक व इतर बांधकाम साहित्याचा तसेच कचऱ्याचा ढीग साचल्याने नागरिकांना चालण्यास त्रास होत आहे. मागील अनेक दिवसापासून हा कचरा तसाच पडून आहे. साचलेला कचरा दुर्गंधी पसरवत असून, परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
या ठिकाणी शालेय दाखले तसेच महसूल संबंधी कागदपत्रे घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लोखंडी साहित्यामुळे पायाला इजा होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली असून अद्याप स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने कार्यालयासमोरील परिसर तातडीने स्वच्छ करावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.