सामाजिक जाणीवेचा स्वच्छ हेतू, माणुसकीचा बांधला सेतू !
चिंचवड, ता.१३ ः सुख-समृद्धीचा सण म्हणजे दिवाळी. प्रत्येकजण आपापल्या परीने हा सण साजरा करतात. परंतु, चिंचवडच्या ‘आपला परिवार’ संस्थेने राजगुरुनगर तालुक्यातील डेहणेगावातील कातकरी कुटुंबांसमवेत सहकुटुंब दिवाळी उत्साहात साजरी केली. तसेच सामाजिक जाणिवेचा स्वच्छ हेतू ठेवत सर्वांच्या सहकार्याने माणुसकीचा सेतू बांधला.
आपला परिवार सोशल फाउंडेशनकडून दरवर्षी महिला दिन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत संस्थेच्या १२१ कुटुंबियांनी डेहणेगावातील ५० कातकरी कुटुंबांना दिवाळी बाजार कीट, महिलांना साड्या; तर ४७ शालेय विद्यार्थ्यांना संपूर्ण क्रीडा गणवेश आणि टोप्या देण्यात आल्या. या उपक्रमाला काशिनाथ वाघ, ज्योती कोरडे, सारिका कावळे, चंद्रकांत कशाळ, ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाउंडेशनच्या सदस्यांचे गावामध्ये वाजत गाजत स्वागत करण्यात आले. कातकरी कुटुंबांतील सुमारे ५५० सदस्यांसमवेत सर्वांनी नाष्टा-जेवण करून पूर्ण दिवस आनंदात घालविला. मंगला कुलवडे यांनी प्रास्ताविक केले. अनिल शर्मा, दत्ता बोराडे यांनी सूत्रसंचालन केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. पांडुरंग राऊत, नितीन गुटकेले, उल्हास तापकीर, विजय शिर्के, गिरीश काटे,नवनाथ नलावडे, किरण कांबळे, भगवंत थोरात, सावळाराम भोर, दिलीप गायकवाड, राजेश देशमुख, बाबा खोसे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कातकरी लोकांसमवेत एवढ्या मोठ्या संख्येने सहकुटुंब पूर्ण दिवस वेळ घालविण्यात आला. असा वक्तशीर कार्यक्रम हा आमच्या गावासाठी पहिलाच सुखद अनुभव ठरला.
- मीना लांजे, सरपंच, डेहणेगाव
एक हात मदतीचा या उपक्रमात आपल्या कमाईच्या पैशांमधून मोठ्या उत्साहात आणि स्वयंस्फूर्तीने कातकरी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी आपला परिवारातील १२१ कुटुंबांनी अतिशय कमी वेळेत प्रचंड प्रतिसाद दिला. ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
- एस.आर. शिंदे, संस्थापक-अध्यक्ष, आपला परिवार सोशल फाउंडेशन
CWD25A02256