उपनगरांत दिवाळीची पहिली रात्रही ‘अंधारात’

उपनगरांत दिवाळीची पहिली रात्रही ‘अंधारात’

Published on

पिंपरी, ता.१८ ः जुनी सांगवी, चिंचवडमधील वाल्हेकरवाडी, मोशी परिसरासह डुडुळगाव, वहिलेनगर आणि ताथवडे भागांत वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने रहिवाशांची दिवाळीची पहिली रात्रही अंधारात गेली. वाल्हेकरवाडीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रहिवाशांची झोप उडाली आहे. तर मोशी गावठाण भाग, जुना मोशी - आळंदी रस्ता आणि आजूबाजूच्या अनेक गल्ल्या-रस्त्यांवरील पथदिवे बंद पडले.
गेल्या काही दिवसांपासून जुनी सांगवीत वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
शुक्रवार (ता.१७) रात्री पहाटेपर्यंत जुनी सांगवीमधील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. ‘ब्रेक डाऊन’ समस्येमुळे शनिवारची पहाट सांगवीकरांना अंधारात घालवावी लागली. शनिवारी दुपारी पुन्हा दुरुस्ती कामामुळे वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. ट्रान्सफॉर्मर, वीजवाहिन्या जुन्या झाल्याने आणि विकास कामात तुटलेल्या केबल ढिगळे लावून तशाच सुरू असल्याने अनेकदा केबल जळण्याच्या घटना घडत आहेत.

मोशीत अपघाताचा धोका
मोशी ः मोशी, डुडुळगाव, वहिलेनगर परिसरातील नागरिक प्रकाशोत्सवाच्या काळातही अंधारातच सण साजरा करण्याच्या स्थितीत आहेत. गावठाण भाग, जुना मोशी-आळंदी रस्ता आणि आजूबाजूच्या अनेक गल्ल्या, रस्त्यांवरील पथदिवे बंद पडले. त्यामुळे रहदारी रात्री धोकादायक होत असून पादचारी, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच रस्त्यावरील श्वानही वाहनांच्या पाठीमागे लागत आहे.


चिंचवडमध्येही वीज गायब
चिंचवड ः गेल्या एक महिनापासून वाल्हेकरवाडीसह आहेरनगर, स्वामी विवेकानंदनगर, शिवाजी पार्क, अथर्व पार्क, चिंतामणी कॉलनी ‘ए’ व ‘बी’ आदी परिसरात रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. गेल्या आठवड्यात तर वीज जाण्याचे प्रमाण चार ते पाच तासांपर्यंत झाले आहे. डासांचा त्रास वाढला असून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण हैराण झाले आहेत.

वाल्हेकरवाडीसह अथर्व पार्क, चिंतामणी कॉलनी परिसरातील ठिकाणी एस.टी लाईनचे काम चालू असल्यामुळे थोडी अडचण आली होती. बाकी मोठा ‘ब्रेक डाउन’ नाही. परंतु लवकरच यासंबंधी आमच्या अधिकाऱ्यांना सांगून ही समस्या दूर करण्यात येईल.
- दिवाकर देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, बिजलीनगर


ताथवडे परिसरातही लपंडाव
हिंजवडी : ताथवडे येथील गाडा रस्ता परिसरातील सोसायट्यांमध्ये चालू आठवड्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. बुधवारी तब्बल १४ तास वीज खंडित झाल्यानंतर शुक्रवारीही (ता. १७) सुमारे चार तास वीज गुल झाल्याने रहिवाशांच्या सणासुदीच्या आनंदावर विरजण पडले.
शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. या परिसरात अनेक मोठ्या सोसायट्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट्स, पाणीपुरवठ्याचे पंप, एसटीपीसारख्या अत्यावश्यक सुविधा ठप्प होतात. परिणामी, सोसायट्यांना दिवसभर जनरेटरवर अवलंबून राहावे लागले. अनेक सोसायट्यांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागला.

आमच्या सोसायटीत तीनशे सदनिका आहेत. असे प्रकार वारंवार घडले; तर आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या हाउसिंग सोसायट्या दिवाळखोरीत जायला वेळ लागणार नाही. या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. महावितरणकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.
- अवनीश माने, अध्यक्ष, द नूक सोसायटी, ताथवडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com