मोहननगरमध्ये सगर उत्सव उत्साहात
चिंचवड, ता. २४ : दिवाळीनंतर पाडव्याच्या मंगलप्रसंगी मोहननगर, चिंचवड येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने सगर उत्सवाचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धा, प्रेम आणि आनंदाने जपली जात आहे.
चिंचवड स्टेशन परिसरातील मोहननगर येथे लिंगायत गवळी समाजाचे वास्तव्य अनेक वर्षांपासून आहे. गाई-म्हशींचे पालन व दुग्धव्यवसाय हा या समाजाचा प्रमुख व्यवसाय असून, दूध, दही, ताक, लोणी, तूप व लस्सी यांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारा हा समाज आपल्या पशुधनावर जिवापाड प्रेम करतो. पंढरपुरी, शिंगाळू, डांग, जाफराबादी अशा विविध जातींच्या गाई-म्हशींसह प्रजननासाठी रेडे पाळण्याची परंपरा या समाजात कायम आहे.
लक्ष्मीपूजनानंतरच्या पाडव्याच्या दिवशी ‘सगर भरविण्याची’ प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. सायंकाळी पंचमंडळींकडून सगर विधीची सुरुवात होते. बहिरवाडे, मिसाळ, नामदे, लंगोटे, अलंकार आदी प्रमुख कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी मंडळी सगराची पूजा करतात. त्यानंतर म्हशींची पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर मिरवणूक काढली जाते.
म्हशी आणि रेडे मालकाच्या आवाजावर धावत येतात. काही शिंगाळू म्हशी म्हैस राखणाऱ्याच्या पाठीमागे पळत असतात, तर काहीजण सायकल किंवा मोटारसायकलवर बसून म्हशींना मागे पळवितात. शेवटी चौधरी त्यांच्या कपाळावर टिळा लावून या मुक्या सवंगड्यांचा सन्मान करतात. सर्व समाजबांधव आणि मान्यवर मंडळी एकत्र येऊन मांडी घालून बसतात. त्यांना मानाचा टिळा लावून प्रसादाचे वाटप केले जाते.
सगर उत्सव हा लिंगायत गवळी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. ज्या गाई-म्हशींच्या जिवावर आपली उपजीविका चालते, त्यांच्याप्रती प्रेम आणि आदरभावना व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्यामुळे गाई-म्हशी पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सरकारी व खासगी दूध उत्पादकांशी स्पर्धा करणे कठीण झाले आहे. तरीही म्हशींचे प्रमाण जरी घटले असले तरी सगर उत्सव आजही उत्साहाने साजरा केला जातो.
- नारायण बहिरवाडे, अध्यक्ष, वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्ट
वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आम्ही लहानपणापासून मोहननगरमध्ये सगर उत्सव साजरा करीत आहोत. यामध्ये रेडे-म्हशी सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि विविध प्रात्यक्षिके सादर केली जातात. लिंगायत समाजाने एकात्मतेची ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जतन केली आहे.
- मारुती भापकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

