स्वच्छतेच्या उद्देशाला पीएमपी कर्मचाऱ्यांचा हरताळ

स्वच्छतेच्या उद्देशाला पीएमपी कर्मचाऱ्यांचा हरताळ
Published on

चिंचवड, ता.८ ः स्वच्छ भारत अभियानाच्या उद्देशाला काही ठिकाणी पीएमपी चालक-वाहकांकडूनच हरताळ फासला जात असून पीएमपी बसथांब्याजवळ तिकिटांचे तुकडे, शिल्लक रोल, प्लॅस्टिक, तंबाखू, चुन्याच्या पुड्या आणि कचरा टाकलेला आढळून येत आहे.
पीएमपीएमएलने ‘आपली पीएमपीएमएल’ हे आधुनिक आणि बहुउद्देशीय ॲप सुरू केले. त्याच्या माध्यमातून प्रवाशांना आता ‘गुगल पे’, ‘फोन पे’ सारख्या ऑनलाइन पेमेंट पद्धतीने ई-तिकीट घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कागदी तिकिटांची गरज संपुष्टात येऊन कागदाची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण अपेक्षित होते. पण, अनेक प्रवासी आणि काही कर्मचारी अजूनही जुनी पद्धत वापरत आहेत.
कागदी तिकिटांवरील छापील शाई रसायनयुक्त असल्याने प्रवासानंतर ती तिकिटे रस्त्यावर फेकल्यास पावसाचे पाणी ती नदी-नाल्यांमध्ये वाहून नेते आणि त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते. हे टाळण्यासाठी ई-तिकीट प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवणे आवश्यक आहे. स्मार्टफोन जवळपास प्रत्येक नागरिकाकडे असताना ही पद्धत सहज शक्य असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत जबाबदारीची जाणीव करून द्यावी, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच ई-तिकीट वापरास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.


वृक्षतोडीला आळा
कागदविरहित तिकिटे म्हणजे वृक्षतोडीला आळा. कचऱ्यातील रासायनिक प्रदूषणावर नियंत्रण आणि स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्याची दिशा. नागरिकांनी आणि पीएमपीएमएलने मिळून हे परिवर्तन घडवले; तर शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ, स्मार्ट आणि पर्यावरणपूरक बनू शकेल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ई-तिकीट प्रणाली लागू झाल्यानंतर रस्त्यांवर रसायनयुक्त कागदाची तिकीटे पडणार नाहीत, अशी अपेक्षा होती. पण, आजही बसथांब्यांजवळ नादुरुस्त, शिल्लक व वापरण्यायोग्य राहिलेले तिकिटांचे रोल, तंबाखू, चुना, गुटख्याच्या पुड्या आणि प्लॅस्टिकच्या डब्यांचा कचरा तसाच पडलेला दिसतो. आम्ही एसकेएफ कंपनीसमोर महानगरपालिकेकडून ओला-सुका कचऱ्याचे डबे बसवून घेतले. पण, त्याचा फारसा उपयोग होत नाही.
- सिकंदर घोडके, पर्यावरण प्रेमी


जवळजवळ एक वर्ष होऊन गेले. पीएमपीएमएलकडून ई-तिकीट चालू आहे. दररोज हजारो नागरिक ‘आपले पीएमपीएमएल’ हे ॲप डाऊनलोड करून त्यावरून तिकिटे काढत असतात. अजून तरी त्या संदर्भात आमच्याकडे काही तक्रारी आल्या नाहीत. बसच्या तिकिटांचे रोल, कचरा नक्की कोण टाकते, हे माहिती नाही व त्यासंबंधी कोणाची तक्रार देखील आलेली नाही. माहिती घेऊन संबंधितांना तशा सूचना देता येतील.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

CWD25A02458

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com