परदेशी भारतीयांबरोबरच टपाल विभागाचीही दिवाळी ‘गोड’
चिंचवड, ता.१२ ः टपाल कार्यालय पुणे विभागामार्फत आयोजित ‘दिवाळी फराळ परदेशात’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे परदेशात स्थायिक भारतीय नागरिकांबरोबरच टपाल विभागाचीही दिवाळी खऱ्या अर्थाने ‘गोड’ झाली. पुणे शहर पूर्व विभागाने सर्व विभागांमधून सर्वाधिक म्हणजे १३ हजार किलो फराळ पाठविला. त्याद्वारे ९४ लाख २० हजार रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
पुणे मुख्य कार्यालयासह पुणे शहर पूर्व आणि पुणे शहर पश्चिम असे दोन विभाग कार्यरत आहेत. त्यापैकी पुणे शहर पूर्व विभागाअंतर्गत येणाऱ्या चिंचवड पूर्व उपविभाग कार्यालयाने त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे योगदान दिले. पुणे मुख्य टपाल कार्यालयाने ७१४ पार्सल्स बुक करून ४७.७७ लाख रुपये तसेच पार्सल पॅकेजिंग युनिटद्वारे ६९९ पार्सल्समधून १ लाख १८ हजार असा एकूण ४८.९५ लाख रुपयांचा सर्वाधिक महसूल मिळविला. त्याखालोखाल चिंचवड पूर्व टपाल कार्यालयाने २९३ पार्सल्स बुक (१९.७८ लाख रुपये), २६७ पार्सल्स पॅकिंग (४३ हजार रुपये) असा एकूण २० लाख २२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त केला. याखेरीज पुणे पूर्व, पश्चिम विभागातील इतर १८ कार्यालयांनीही आपापल्या परीने परदेशातील भारतीयांची दिवाळी गोड करण्यात वाटा उचलला.
या उपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेतून पारंपरिक दिवाळी फराळ, गोडधोड पदार्थ परदेशात राहणाऱ्या नातलग व मित्र परिवारांपर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहन देण्यात आले. या दरम्यान ग्राहकांना माफक आंतरराष्ट्रीय दर, विनामूल्य पिकअप सेवा आणि टपाल कार्यालयातील पॅकिंग सुविधा अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या.
सर्वाधिक पार्सल जर्मनीला
या अभियानांतर्गत पुणे पूर्व, पश्चिमसह एकूण १० विभागांमधून परदेशात एकूण सुमारे २१ हजार किलो फराळ पाठविण्यात आला. त्यात जर्मनीला सर्वाधिक ३४९ पार्सल्स (२०.५४ लाख रुपये महसूल) पाठविण्यात आले. त्यानंतर रशिया (२१४ पार्सल्स, १७.६३ लाख रुपये महसूल) आणि यूके (२८० पार्सल्स, १६.६५ लाख रुपये महसूल) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासह एकूण १९ पेक्षा जास्त देशांत नागरिकांनी पार्सल्स पाठविले.
या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व स्तरांवरील टपाल कर्मचाऱ्यांचा समर्पित योगदान दिले. बुकिंग पोस्ट मास्टर, पोस्टमन, विभागीय कार्यालये व मार्केटिंग टीमचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित करावे लागेल. हे अभियान केवळ टपाल सेवांचे यश नाही; तर परदेशातील मराठी माणसांच्या मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला आहे.
- अभिजित बनसोडे, संचालक (टपाल सेवा), भारतीय टपाल विभाग
PNE25V67303
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

