

चिंचवड, ता. १९ ः योग विद्या धाम पिंपरी चिंचवड संस्थेच्या कार्यकारिणीत महेश भोईर यांची निवड करण्यात आली आहे. समाजातील सर्व स्तरांपर्यंत योग पोहोचविण्याच्या त्यांच्या योगदानाची दखल घेत संस्थेने हा सन्मान प्रदान केला. संस्थेने आजवर अनेक दर्जेदार योगशिक्षक घडविले आहेत. साधारण २००० शिक्षक सदस्य आहेत. महेश भोईर हे गेल्या दोन वर्षांपासून वस्ताद मुरलीधर माचुत्रे व्यायामशाळा येथे नियमित योगाभ्यास वर्ग घेत असून, नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यंदा त्यांची संस्थेच्या कार्यकारिणीत निवड करण्यात आली. याप्रसंगी केंद्रप्रमुख प्रमोद निफाडकर, कार्याध्यक्ष दशरथ जगताप, उपाध्यक्ष प्रवीण महादर आदी उपस्थित होते.